गडचिरोली : आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत उत्कृष्ट सेवा देणाऱ्या गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले आहे. आता त्यात आणखी दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांची भर पडली आहे. बेस्ट सायबर सिक्युरिटी उपक्रम आणि बेस्ट आयटी हेड हे दोन पुरस्कार बँकेला जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण येत्या 19 ऑक्टोबरला लखनौ येथे होणाऱ्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिटमध्ये केले जाणार आहे.
नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट व बँकिंग फ्रंटीअर्स तर्फे दरवर्षी बँकिंग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामकाजासाठी देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांना या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. रिझर्व्ह बँक व नाबार्डने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञान, बेस्ट एन.पी.ए. व्यवस्थापन, उत्कृष्ट ठेव वृध्दी, बेस्ट एच.आर. या क्षेत्रांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षात गडचिरोली जिल्हा बँकेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिली. त्यासाठी “बेस्ट सायबर सिक्युरिटी उपक्रम” आणि “बेस्ट आय.टी.हेड” हे दोन पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर करण्यात आले आहे. बँकेच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाखांमध्ये माहिती तंत्रज्ञानामार्फत ग्राहकांना ए.टी.एम., मोबाईल बँकिंग, युपीआय, क्युआर कोड, आय.एम.पी.एस.ई. अत्याधुनिक डिजीटल बँकिंग सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या काही दिवसांत ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे. आजच्या स्थितीत बँकेकडे 57 शाखांच्या माध्यमातुन 4 लाख 35 हजार खातेदार असून त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून बँकिंग सुविधा उपलब्ध केली जात आहे.
गडचिरोली जिल्हा बँकेला सदर दोन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी बँकेचे जिल्ह्यातील सर्व खातेदार, ग्राहक, शेतकरी वर्ग, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासद, महिला बचत गटांचे सदस्य व बँकेचे अधिकारी तथा कर्मचारी यांचे आभार मानले.