जिल्हा सह.बँकेला राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट पेमेंट ट्रान्सफॅार्मेशन’ पुरस्कार

गोवा येथील सोहळ्यात सन्मान

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2024-25 या आर्थिक वर्षात डिजीटल प्रणालीद्वारे केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘बेस्ट पेमेंट ट्रान्सफॅार्मेशन’ या पुरस्काराने गोवा येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. बँकिंग फ्रंटिअर्स व नॅशनल को-आॅपरेटिव्ह बँकिंग समितीतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि नागरी सहकारी बँकांना या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हा बहुमान गडचिरोली जिल्हा बँकेने पटकावला आहे.

गोवा येथे आयोजित या कार्यक्रमात गोवा राज्याचे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आणि बँकेच्या आयटी विभागाचे उपसरव्यवस्थापक हर्षवर्धन भडके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी गुजरात अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता अतिथी म्हणून उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेने दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शाखांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या मार्फत ग्राहकांना एटीएम, मोबाईल बँकिंग, युपीआय, क्यू-आर कोड, आयएमपीएस इत्यादी आधुनिक डिजीटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेच्या खातेधारकांनी युपीआयच्या माध्यमातून 1.06 कोटीचे व्यवहार, क्यु-आर कोडच्या माध्यमातून 2.12 कोटीचे व्यवहार, तर मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून 10.09 लाखांचे व्यवहार डिजीटल प्रणालीद्वारे केले आहेत.

या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ तथा सीईओ सतीश आयलवार यांनी जिल्ह्यातील बँकेचे सर्व खातेदार, ग्राहक, शेतकरी, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासद, महिला बचत गटांचे सदस्य तथा बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.