गडचिरोली जिल्हा बँकेला पुन्हा वैकुंठभाई मेहता पुरस्कार

आतापर्यंत 12 वेळा मानकरी

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन 2023-24 चा राज्यस्तरावरील कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार जाहीर झाला आहे. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील 21 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून या पुरस्कारासाठी एका बँकेची निवड केली जाते. गडचिरोली जिल्हा बँकेने आतापर्यंत 12 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे हे विशेष. (सविस्तर बातमीसाठी खाली स्क्रोल करा)

रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांना कै.वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-2024 चा पुरस्कार गडचिरोली जिल्हा बँकेला जाहीर झाला असून सदर पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

पुरस्कारासाठी निवड करताना प्रामुख्याने सी.आर.ए.आर., एन.पी.ए.चे प्रमाण, नफा व दर आर्थिक वर्षात होणारी व्यवसाय वृद्धी इत्यादी निकषास पात्र असणाऱ्या जिल्हा बँकांना पुरस्कार देवुन गौरविण्यात येत असते. दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मागील 29 वर्षापासून बँकेच्या 57 शाखांच्या
माध्यमातून जिल्ह्यातील दु्र्गम व अतिदु्र्गम भागातील लोकांना बँकिंग सुविधा पुरवित आहे. बँकेने ग्राहकांकरीता मोबाइल बँकिंग, आय.एम.पी.एस. आणि यु.पी.आय. अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषाला पात्र राहून जिल्हा बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंग सुविधेचा परवानाही दिला आहे. इंटरनेट बँकिंग परवाना प्राप्त झालेली ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील आठवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली आहे.

चंद्रपूर जिल्हा बँकेचे विभाजन होऊन सन 1985 ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. त्यावेळी बँकेचा एकुण व्यवसाय फक्त 6 कोटींचा होता. बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांची दूरदृष्टी व मार्गदर्शनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, गरीब, शेतकरी व दु्र्गम भागातील लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्मात टप्याटप्याने शाखांचा विस्तार होऊन आज बँकेच्या 57 शाखा कार्यरत आहेत. मागील 40 वर्षात बँकेने अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत.