गडचिरोली : देशातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतुने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या बँको ब्ल्यू रिबन या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारावर पुन्हा एकदा गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेने आपले नाव कोरले आहे. देशभरातली 370 बँकांमधून सलग 9 व्या वेळी गडचिरोली जिल्हा बँकेने हा पुरस्कार पटकावत राज्यासह देशातील सहकारी बँकांमध्ये आपले वेगळे स्थान दाखवून दिले आहे.
31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीवर 2500 ते 3000 कोटींच्या ठेव वृद्धी श्रेणीतील राष्ट्रीय स्तरावरचा हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे. पुरस्काराचे वितरण येत्या 28 जानेवारी 2025 रोजी लोणावळा येथे होणार आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ठेव वृद्धीसह रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार बँकेचे एनपीएचे प्रमाण, सीआरएआर आदी निकषात बँक पात्र झाली. यापूर्वी बँकेला बँकिंग फ्रंटिअर्सतर्फे दिल्या जाणाऱ्या सन 2018, 2022 व 2024 या वर्षाच्या उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार आणि 2016 ते 2023 पर्यंत सलग 8 वर्ष बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
बँकेने पार केला 3706 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा
गडचिरोली जिल्हा बँकेकडे 31 मार्च 2024 च्या आर्थिक स्थितीनुसार 2687 कोटींच्या ठेवी असून बँकेने 3706 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार करून आता 4 हजार कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत आहे. बँकेच्या ठेववृद्धीत दरवर्षी 18 ते 20 टक्क्यांनी वाढ होत आहे. बँकेचे करंट अकाऊंट सेव्हिंग डिपॅाझिटचे प्रमाण 72 टक्के असून सर्वात जास्त कासा ठेवचे प्रमाण असणारी ही भारतातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने 57 शाखा व 28 ए.टी.एम.च्या माध्यमातून जिल्ह्यातील
ग्राहकांना अत्याधुनिक बँकींग सुवधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. सदर पुरस्कारात जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, टेवीदार, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य व हितचिंतक, तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचेही योगदान असून त्यांच्या सहकार्यासाठी बँकेचे अध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संचालकगण तथा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी आभार मानले.