गोंडवाना विद्यापीठात गोंडी, माडिया संभाषण अभ्यासक्रम

आज होणार उद्घाटन समारंभ

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील आदिवासी अध्यासन केंद्राच्या वतीने ‘गोंडी-माडिया संभाषण कौशल्य अभ्यासक्रम’ सुरू केला जात आहे. त्याचा उद्घाटन समारंभ आज 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता विद्यापीठाच्या जुन्या सभागृहात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशान्त बोकारे, तर प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे उपस्थित राहतील. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांची प्रमुख उपस्थिती राहील.

आदिवासी अध्यासन केंद्र, इंग्रजी आणि इतिहास विभाग, गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
गोंडी-माडिया संभाषण कौशल्य अभ्यासक्रम हा सर्व स्तरांवरील शिकाऊ उमेदवारांसाठी तयार करण्यात आलेला एक परिचयात्मक भाषा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये दैनंदिन संवाद, उपयुक्त शब्दसंपदा, लोकसाहित्य तसेच सांस्कृतिक संदर्भ यांच्या आधारे गोंडी-माडिया भाषेतील मूलभूत संभाषण कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक संस्कृती आणि बोलीभाषांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने तो तयार करण्यात आला आहे.

आदिवासी संस्कृती आणि भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी अध्यासन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.