गडचिरोली : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध खेळांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, विभागीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे केले होते. प्रत्येक वयोगटांमध्ये (14, 17 व 19 वर्षे) जास्तीत जास्त सहभाग नोंदवून राष्ट्रीयस्तरावर प्राविण्य मिळवल्याबद्दल जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून गोंडवाना सैनिकी विद्यालयाला यावेळी गौरविण्यात आले. प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, क्रीडा शिक्षक भूपेंद्र चौधरी यांच्यासह विद्यार्थ्यांचा सत्कार करून अनुदान (धनादेश) सुपूर्द करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, विविध खेळांच्या संघटना, शाळा-महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, तालुका क्रीडा अधिकारी वराडकर, क्रीडा मार्गदर्शक नाजूक उईके, बडगेलवार, क्रीडा कार्यालयाचे मेश्राम व बलोदे आणि जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.