गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठातील प्रस्तावित ‘पं.दिनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद’ हे अध्यासन केंद्र सुरू करण्यावर अखेर व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे नावावरून निर्माण झालेल्या वादावर आता पडदा टाकण्यात आला आहे. या अध्यासनाचे उद्घाटन शनिवार, १९ ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे होईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
या अध्यासनाच्या विरोधात आणि समर्थनात काही निवेदने गोंडवाना विद्यापीठाला प्राप्त झालीत. त्यावर व्यवस्थापन परिषदेच्या १८ ऑगस्ट रोजीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती पं.दिनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद या अध्यासनाचा उद्घाटन कार्यक्रम ठरल्याप्रमाणे १९ ऑगस्ट रोजी होईल, असा निर्णय एकमताने घेण्यात आला.
गोंडवाना विद्यापीठाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील ७ व्या कलमान्वये, ‘स्त्रि-पुरूष भेद, वंश, पंथ, वर्ग, जात, जन्मस्थान, धर्म किंवा मतप्रणाली इत्यादी विचारात न घेता विद्यापीठ सर्वांना खुले आहे’. शिवाय, ‘वेगवेगळे धर्म, साहित्य, इतिहास, विज्ञान, एकात्मता, बंधुता वाढीस लावणे’, हेही विद्यापीठाचे उद्दीष्ट्य आहे. याच अनुषंगाने ‘पं.दिनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद’ या अध्यासनाला अधिसभेत एकमताने मंजुरी मिळाली. पुढे विद्या परिषद व व्यवस्थापन परिषदेनेही या अध्यासनाला मंजुरी दिली. शासनाकडूनही अध्यासनासाठी निधी देण्यात आला. हा निर्णय अधिसभेने घेतला असल्याने आणि अधिसूचनेप्रमाणे, अधिसभेच्या संमतीशिवाय कोणताही पारित प्रस्ताव मागे घेतला जाऊ शकत नसल्याने या अध्यासनाचा कार्यक्रम आता थांबवता येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे उद्घाटनही थाटात पार पडले असून जगद्गुरू तुकाराम महाराज अध्यासन, क्रांतीवीर बिरसा मुंडा आदिवासी संस्कृती अध्यासन, म.ज्योतिबा फुले अध्यासन, संत तुकाराम महाराज अध्यासन, महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन आदी विविध अध्यासनांच्या अंमलबजावणीचे काम सुरू आहे. त्यामुळे ‘पं.दिनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद’ अध्यासनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही शांततेत व उत्साहात पार पाडावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले आहे.