सेवाकर्मी कार्यक्रमांच्या गुणांकनात गोंडवाना विद्यापीठ राज्यात प्रथम

नामांकित विद्यापीठांना टाकले मागे

गडचिरोली : उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयामार्फत राज्यातील विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांसाठी सेवाकर्मी उपक्रमांच्या आधारे गुणांकन केले जाते. गोंडवाना विद्यापीठाने त्यात इतर विद्यापीठांना मागे टाकत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरीचा मान मिळवला आहे.

आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम, सर्व संवर्गाची अद्ययावत जेष्ठता सूची प्रसिद्ध करणे, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळसेवा नियुक्ती, रिक्त पद स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा नियुक्ती, आयजीओटी पोर्टलवर रजिस्ट्रेशन व पाच कोर्स पूर्ण करणे, सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक आद्ययावत करणे व डिजिटल करणे, तसेच विद्यापीठातील प्रशासनिक पारदर्शकता, कर्मचारी सेवा-सुविधांचे प्रभावी व्यवस्थापन, कार्यालयीन प्रक्रियेतील वेग व जबाबदारी, सेवांचे ऑनलाइन रूपांतरण, नागरिककेंद्रित दृष्टीकोन आणि कर्मचारी कल्याणाशी निगडित उपक्रम या सर्व घटकांच्या आधारे हे गुणांकन केले जाते. गोंडवाना विद्यापीठाने सर्व निर्देशकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

दर्जेदार सेवा हीच बांधिलकी- कुलगुरू

कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी या यशाची नोंद घेत सर्व् विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. ते म्हणाले की, “हे यश विद्यापीठातील प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व प्राध्यापकवृंद यांचे एकत्रित परिश्रम, कार्यशिस्त आणि सेवाभावनेचे फलित आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हीच आमची बांधिलकी आहे. आगामी काळातही उत्कृष्टतेचा हा स्तर वाढवत ठेवू.”

गोंडवाना विद्यापीठाची अल्पावधीत उल्लेखनीय कामगिरी

यापूर्वी सुद्धा गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाला राज्य शासनाचा पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील रासेयोचे दोन पुरस्कार मिळाले. वेळेत परीक्षांचे निकाल घोषित करण्यात गोंडवाना विद्यापीठाची ख्याती असल्याने राज्यपालांचे प्रशस्तीपत्र, गोंडवाना विद्यापीठाच्या ग्रामसभा सक्षमीकरणाच्या एकल प्रकल्पाला भारत सरकारचा फिक्की पुरस्कार, भारत सरकारच्या ई-समर्थ प्रणाली मोड्युल्सची अंमलबजावणी करण्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ राज्यात द्वितीय आहे, अशी उल्लेखनीय कामगिरी गोंडवाना विद्यापीठाने अल्पावधीत साध्य केली आहे. या यशामुळे गडचिरोली–चंद्रपूर जिल्ह्यांतील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला आहे.