सरकारला योग्य वाटेल त्यावेळी दारूबंदीवर योग्य निर्णय घेतील

सहपालकमंत्र्यांचे प्रतिपादन

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटविणे किंवा कायम ठेवणे हा माझ्या स्तरावरील विषय नाही. तो सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग आहे. त्यामुळे त्यासंदर्भात सरकारला योग्य वाटेल त्यावेळी ते योग्य तो निर्णय घेतील, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी केले. गुरूवारी गडचिरोलीत ते माध्यमांशी बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिकरणामुळे चंद्रपूरच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटविली जाणार का, या प्रश्नावर त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. काही वर्षांपासून राज्यातील वनविभागाच्या सर्व विश्रामगृहांमध्ये मद्य आणि मांसाहारावर बंदी आहे. पण वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते. परिणामी ते वनविभागाच्या विश्रामगृहाऐवजी खासगी रिसॅार्टमध्ये राहतात, अशी खंत व्यक्त करत ना.आशिष जयस्वाल यांनी वनमंत्र्यांना पत्र लिहून वनविभागाच्या विश्रामगृहांमधील मांसाहार बंदी उठविण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

गडचिरोली जिल्ह्यातही पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी दारूबंदी उठविण्याची मागणी जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनीही त्यावर स्पष्ट भूमिका घेत दारूबंदी उठविण्याची मागणी केली होती. मात्र सहपालकमंत्री जयस्वाल यांनी हा आपल्या स्तरावरील विषय नसल्याचे सांगत स्पष्ट भूमिका मांडण्याचे टाळले.