आपत्तींचे नुकसान कमी करण्यात विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची ठरेल

गोंडवानाच्या शिबिरात राज्यपालांचे मार्गदर्शन

गडचिरोली : सरकार सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. मात्र विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास आपत्तींची तीव्रता, नुकसान कमी करण्यास मदत होईल. त्यासाठीच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम ‘आव्हान’ तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी समर्पित भावनेने योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले.

सोमवारी गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी आॅनलाईन उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मंचावर खासदार अशोक नेते, आ.कृष्णा गजबे, पोलिस अधीक्षक निलोत्पल, कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील, एनडीआरएफचे सहायक समादेशक प्रवीण धट, सिनिअर इन्स्पेक्टर कृपाल मुळे, तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्याशाखेचे डॉ.चंद्रमौली, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.श्याम खंडारे, कोल्हापूर विद्यापीठाचे रासेयो संचालक तानाजी चौगुले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी, प्रशांत मोहिते, प्रा.डॉ. विवेक जोशी, गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ.दिनेश नरोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी खासदार अशोक नेते म्हणाले, जिल्ह्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. या आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी अशा प्रशिक्षणामुळे मदत होईल. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात अशा आपत्तींमध्ये यंत्रणेला मदत करावी, असे आवाहन खा.नेते यांनी यावेळी केले. कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे म्हणाले, प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी आ.कृष्णा गजबे, पोलिस अधीक्षक निलोत्पल, स.समादेशक प्रवीण धट यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.श्याम खंडारे यांनी, संचालन डॉ.शिल्पा आठवले यांनी तर आभार कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वयक डॉ.प्रिया गेडाम यांच्यासह विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.