विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू

पात्र मतदारांनो, नोंदणी करा- पंडा

राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांना मतदार नोंदणी प्रक्रियेची माहिती देताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा.

गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी 1 नोव्हेंबर, 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 18 (Form 18) भरून अर्ज करण्याचे आवाहन पदवीधर मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे टप्पे आणि महत्त्वाच्या तारखा :

या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी 30 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात आली. मतदार नोंदणीसाठी नमुना 18 द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 (गुरुवार) आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी 25 नोव्हेंबर 2025 (मंगळवार) रोजी होईल. याच दिवसापासून दावे व हरकती स्वीकारण्यास सुरुवात होईल, ज्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर, 2025 (बुधवार) आहे. दावे व हरकतींवर 25 डिसेंबरपर्यंत निर्णय घेऊन पुरवणी यादी तयार केली जाईल. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 30 डिसेंबर, 2025 (मंगळवार) रोजी होणार आहे.

नाव नोंदणीसाठी आवश्यक पात्रता आणि नियम

नागपूर पदवीधर मतदार संघात मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
* शैक्षणिक पात्रता : अर्जदाराने भारतातील कोणत्याही विद्यापीठातून पदवी परीक्षा किंवा तत्सम समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
* पदवीची वेळ मर्यादा : पदवी परीक्षा अर्हता दिनांकाच्या (01/11/2025) तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण केलेली असावी.
* कालावधीची गणना : तीन वर्षांच्या कालावधीसाठी विद्यापीठाने निकाल जाहीर/प्रसिध्द केल्याचा दिनांक गृहीत धरला जाईल, दीक्षांत समारंभाची तारीख नाही.
* निवासी अट : मतदाराचे नागपूर पदवीधर मतदार संघात सर्वसाधारण रहिवास असावे आणि तो भारताचा नागरिक असावा.
* नवीन अर्ज अनिवार्य : जरी तुमचे नाव सन 2020 च्या मतदार यादीत समाविष्ट असले तरी, 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार होत असल्याने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

* अर्जाचा नमुना : पदवीधर मतदारसंघाकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी विहित नमुना 18 मध्ये अर्ज दाखल करायचा आहे.
* अर्ज कुठे सादर करावा : नमुना 18 चा दावा/अर्ज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय येथे नियुक्त केलेल्या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे करता येईल.
* टपाल सुविधा : पदवीधर मतदार टपालाद्वारे नमुना 18 आवश्यक साक्षांकित केलेल्या कागदपत्रांसह सादर करू शकतो.
* अपवाद : गठ्ठा पध्दतीने (मोठ्या संख्येने) नमुना 18 अर्ज वैयक्तिकरित्या किंवा टपालाद्वारे, BLA द्वारे अथवा राजकीय पक्ष यांना सादर करता / स्वीकृत केला जाणार नाही. तथापि, विभाग प्रमुख त्यांचे अधिनस्थ पात्र पदवीधर अधिकारी व कर्मचारी यांचे नमुना 18 चे दावे एकत्रित सादर करू शकतात. तसेच, कुटुंबातील व्यक्ती त्याच्या कुटुंबातील पात्र पदवीधर मतदाराचा दावा आवश्यक कागदपत्रांसह दाखल करू शकतो, परंतु यासाठी दोघांचा रहिवास पत्ता सारखा असणे अनिवार्य आहे.

खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक :

विद्यापीठाने निर्गमित केलेली पदवी (Degree), किंवा सरकारी दप्तरी पदवीबाबतची नोंद, किंवा विद्यापीठाने पदवीधारण केल्याबाबत निर्गमित केलेले नोंदणी कार्ड, किंवा पदवीचे अंतिम वर्ष उत्तीर्ण केलेली मूळ गुणपत्रिका.

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीकरीता विभागीय आयुक्त, नागपूर हे मतदार नोंदणी अधिकारी आहेत. गडचिरोली जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली व उपविभागीय अधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी विहित नमुना-18 अर्ज आवश्यक पुराव्यांसह 6 नोव्हेंबर, 2025 पर्यंत दाखल करून मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.