गडचिरोली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने वर्ष 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदान योजनेअंतर्गत 25 आणि बीजभांडवल योजनेअंतर्गत 40 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
ही योजना मांग, मातंग, मादगी, मादिगा समाज तसेच त्यांच्या 12 पोटजातींतील गरजू नागरिकांसाठी राबविण्यात येत आहे. या समाजातील अर्जदारांचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे आणि त्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेंतर्गत लाभ घेतलेला नसावा, अशी अट आहे.
कर्जासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
जिल्हा कार्यालयात सध्या अनुदान व बीजभांडवल योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अर्ज करताना काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यात जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, घरकर पावती किंवा नमुना 8, व्यवसायासंबंधी कोटेशन व प्रकल्प अहवाल, तसेच व्यवसायासंबंधी प्रशिक्षण अथवा अनुभव प्रमाणपत्र.
कर्ज प्रस्ताव सादरीकरणाचे ठिकाण
इच्छुक अर्जदारांनी आपले पूर्ण कर्ज प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या., डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय.च्या मागे, एल.आय.सी.रोड, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावेत.
गरजू समाजघटकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाकडे नेण्याचा या योजनांचा हेतू असून पात्र अर्जदारांनी वेळेत अर्ज सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.बी. गौड यांनी केले आहे.
            































