Home दैनंदिन बातम्या कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी

कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी

172 रुग्णांची केली तपासणी

कुरखेडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दिव्यांगत्व प्रमाणपत्र (UDID) तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुक्यातील व परिसरातील एकूण 172 रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.

शिबिरामध्ये विविध विभागांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सामान्य औषधवैद्यक (Gen Med.) विभागातून सर्वाधिक 136 रुग्णांची तपासणी झाली, तर शस्त्रक्रिया विभागात 110 रुग्णांनी नोंदणी केली. तसेच अस्थिव्यंग विभागात 76, बालरोग विभागात 37 आणि नाक-कान-घसा विभागात 13 रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. काही रुग्णांनी एकापेक्षा जास्त आजारांसाठी तपासणी करून घेतल्याने विभागनिहाय आकडा मोठा असला तरी, एकूण 172 पात्र लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा मुख्यालयाची पायपीट करावी लागू नये, याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी हे शिबिर स्थानिक पातळीवर घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या नियोजनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित ठमके यांच्या विशेष पुढाकाराने पार पडलेल्या या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांची नावनोंदणी व तपासणीचे काम सुलभ झाले आहे.

या शिबिरामध्ये डॉ.इंद्रजीत नागदेवते (भिषक), डॉ.सचिन कवाडकर (भिषक), डॉ.बाळू सहारे (अस्थीरोगतज्ज्ञ), डॉ.मिथिलेश आत्राम (बालरोगतज्ञ), डॉ.मस्के (नेत्ररोगतज्ञ), डॉ.अजय कांबळे (ENT), डॉ.कमलेश परसवाणी (शल्य चिकित्सक) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.