अहेरीतील गणेशोत्सवात राजस्थानच्या ‘हवामहल’चा देखावा ठरतोय आकर्षण

राजमहालासमोर 'अहेरीचा राजा'

अहेरी : अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या अहेरी राजमहाल समोर विराजमान श्रीकृष्ण अवतारातील “अहेरीचा राजा”च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. कोलकाता येथील कारागिरांनी एक महिना परिश्रम घेऊन संपूर्ण थर्माकोलने बनविलेला राजस्थानमधील “हवामहल” या देखावा भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे.

“अहेरीचा राजा”चे दर्शन घेण्यासाठी तसेच आकर्षक देखावा बघण्यासाठी अहेरीसह परिसरातील विविध तालुके, तसेच लगतच्या तेलंगणा राज्यातूनही गणेश भक्तांची गर्दी होत आहे. अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते दररोज सकाळी, संध्याकाळी आरती आणि गणेश पूजन केले जाते. यावेळी राणी रुक्मिणीदेवी, कुमार अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा यांच्यासह भाविकांची मोठी गर्दी असते.