Home दैनंदिन बातम्या लाहेरीतील विषबाधा प्रकरणात मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

लाहेरीतील विषबाधा प्रकरणात मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित

सहा जणांची वेतनवाढ रोखली

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरीच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत मु्ख्याध्यापक डी.जी. रापंजी आणि अधीक्षक एम.एम. पाटील यांना निलंबित केले. याशिवाय अधिक्षिका व पाच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी दिले.

दि.28 जानेवारी रोजी आश्रमशाळेतील 70 च्या जवळपास विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने आधी लाहेरी, भामरागड आणि अहेरी येथील रुग्णालयांत हलवण्यात आले होते. या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चांगलीच बिघडली होती. पण वैद्यकीय उपचारानंतर ते बरे झाले.

या घटनेनंतर आमदार डॉ.मिलिंद नरोटे, प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केल्यानंतर स्वयंपाकगृहातील अस्वच्छता दिसली होती. विद्यार्थ्यांसाठी ठेवलेली फळे, धान्य व भाजीपाला सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे या घटनेसाठी मुख्याध्यापक, अधीक्षक हेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. निलंबन काळात मृख्याध्यापक रापंजी यांचे मुख्यालय जांबिया (एटापल्ली), तर अधीक्षक पाटील यांचे मुख्यालय हालेवारा येथे ठेवण्यात आले आहे.

या रिक्त पदांचा प्रभार तातडीने उच्च माध्यमिक शिक्षक आर.एन.हारमे आणि वरिष्ठ लिपिक वैभव देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.