भामरागड : गेलेली संपत्ती परत येवु शकते, परंतु बिघडलेले आरोग्य परत येऊ शकत नाही. याकरिता सर्वांनी
आरोग्याची काळजी घ्यावी, असे मार्गदर्शन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी भामरागड येथे केले.
आयुष्यमान भव ही शासनाची महत्वाकांक्षी मोहिम 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत भामरागड येथे आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यानिमित्त सीईओ सिंह यांनी पहिल्यांदाच भामरागडला भेट देऊन मेळाव्याला मार्गदर्शन केले.
आयुष्यमान भव मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. मधुमेह, रक्तदाब, सिकलसेल तपासणी, माता व बालकांचे आरोग्य, कुष्ठरोग, क्षयरोगाबाबत तपासणी, औषधोपचार केला जाणार आहे. तसेच लसीकरण, डोळयांची तपासणी या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड, आभा कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी या सर्व योजना आणि उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी आयुषी सिंह यांनी केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेन्द्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अर्चना इंगोले, डॉ.बागराज धुर्वे, गटविकास अधिकारी मगदुम, तालुका आरोग्य अधिकारी भूषण चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक कातकडे, डॅा.अमित साळवे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन आनंद मोडक यांनी केले.