760 पोलीस अधिकारी व अंमलदारांची आरोग्य तपासणी

मानसिक आरोग्याचेही आव्हान

गडचिरोली : पोलीस दलाकडून आपल्या आस्थापनेवरी अधिकारी आणि अंमलदारांसाठी वेळोवेळी अनेक कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. विशेषत: माओवादविरोधी अभियान, महत्वपूर्ण व्यक्तींच्या भेटीदरम्यानचा बंदोबस्त, कायदा सुव्यवस्था तसेच गुन्हे तपास यांसारखे कर्तव्य बजावत असताना पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याच्या आव्हानांचा सामना करावा लागत असतो. त्याचाच विचार करून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय मंगल कार्यालयस्थित बॅटमिंटन कोर्ट येथे हे शिबिर पार पडले. या दोन दिवसांच्या संयुक्त वैद्यकीय तपासणी शिबिरात पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, सी-60, सॅग तसेच सर्व शाखा व पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालयीन स्टाफ मिळून एकूण 760 अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

यावेळी सर्व वयोगटातील अधिकारी व अंमलदार यांच्या ब्लड शुगर, लिपिड प्रोफाईल, सीबीसी, मूत्रपिंड कार्य तपासणी, यकृत कार्य तपासणी, थायरॉईड, रक्तदाब मोजणी अशा विविध आरोग्य तपासण्या घेण्यात आल्या. सदर शिबिराच्या मदतीने गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ यांना शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होणार आहे.

जिल्हा शल्सचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्सचिकित्सक डॉ.सतीश सोळंकी, निवासी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जितेंद्र डोलारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने ही आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि नरेंद्र पिवाल व अंमलदारांनी परीश्रम घेतले.