यवतमाळच्या तुळजाई संस्थेकडून येवलीत आरोग्य तपासणी शिबिर

आरोग्य हा ज्येष्ठांचा ठेवा- डॅा.नेते

आरोग्य तपासणीसाठी शिबिराप्रसंगी गावकऱ्यांशी संवाद साधताना मा.खा.डॅा.अशोक नेते

गडचिरोली : तालुक्यातील येवली येथे यवतमाळच्या जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेसह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स (मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँण्ड एम्पॅावरमेंट) यांच्या सहकार्याने तसेच संदेश गडचिरोली व आरोग्य पथक येवली यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, वय वाढत असताना नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षणे दिसेपर्यंत थांबण्यापेक्षा वेळोवेळी तपासणी करून योग्य औषधोपचार घेणे हीच खरी सजगता आहे. म्हातारपण सुसह्य होण्यासाठी हाच खरा ठेवा आहे. वृद्धांचा सन्मान हीच खरी सेवा आहे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्मान भारत योजना’ अस्तित्वात आणली, ज्यामुळे ग्रामीण व सामान्य नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर मोफत व सुलभ आरोग्यसेवा मिळू लागली आहे. मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे आज देशात आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. स्वच्छता, संतुलित आहार व सकारात्मक विचारसरणी यावर भर दिला जात आहे. यामुळेच नागरिकांचे आयुष्य निरोगी, सुरक्षित व समाधानकारक होत आहे. जेष्ठ नागरिकांनी या उपक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी डॅा.नेते यांनी केले.

यावेळी डॉ.नेते यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घेत शिबिराच्या उपयुक्ततेचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.

जेष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त तपासण्या

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, मुखरोग, दृष्टी तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच जेष्ठ नागरिकांना मोफत औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.राजकुमार पटेल, प्रकल्प अधिकारी आकाश धुरट, सरपंच युवराज भांडेकर, दंतवैद्यकीय अधिकारी डॉ.अंकिता धाकडे, फार्मासिस्ट शेट्टी, गुरुदास सेमस्कर, ग्रामपंचायत सदस्य चोखाजी बांबोळे यांची उपस्थिती होती.