आणखी तीन दिवस पावसाचे, दुर्गोत्सवातील गरब्याला फटका

पर्लकोटाच्या पुलावर चढले पाणी

पावसानंतर गडचिरोलीत गुरूवारी संध्याकाळी गरबाचा आनंद लुटण्यात आला. पण पाहणाऱ्यांची संख्या रोडावली होती.
पर्लकोटा नदीवरील पुलावर आज पहाटे पाणी चढल्याने अनेक जण अडकून पडले.

गडचिरोली : बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दि.24 च्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरी दि.25 ला दिवसभर अधूनमधून कोसळत होत्या. त्यात दि 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान, म्हणजे आणखी तीन दिवस पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे दुर्गोत्सवातील गरबा, दांडियासारख्या खुल्या मैदानावर किंवा खुल्या मंचावर होणाऱ्या कार्यक्रमांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. दरम्यान छत्तीसगडसह भामरागड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पर्लकोटा नदीला मध्यरात्री पूर येऊन पाणी पुलावर चढले. त्यामुळे भामरागडसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 26 सप्टेंबर रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 27 सप्टेंबर रोजी दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासह गडचिरोली आणि शेजारील भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 सप्टेंबर रोजी उर्वरित विदर्भाप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

काढणी झालेली पिके पाऊस व वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असेही आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

गुरूवारी 52.3 मिमी पाऊस

बुधवारच्या रात्रीपासून गुरूवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर 52.3 मिमी पाऊस बरसला. त्यात गडचिरोली तालुक्यात 64.3 मिनी तर आरमोरी, मुलचेरा, अहेरी, भामरागड तालुक्यात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस कोसळला. सर्वात कमी 17.8 मिमी पाऊस कुरखेडा तालुक्यात झाला.