आज पावसाचा रेड अलर्ट, सतर्क राहा – जिल्हाधिकारी

आलापल्लीतील वसाहतीत पाणी

आलापल्लीतील फुकट नगरात पाहणी करताना हर्षवर्धनबाबा आत्राम, डॅा.मिताली आत्राम.

​गडचिरोली : पावसाने ‘ब्रेक के बाद’ जोरदार कमबॅक करत आधीचा बॅकलॅाग भरून काढला आहे. गुरूवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आलापल्लीच्या बीएसएनएल टॅावरजवळील भागात काही घरांमध्ये पाणी शिरल्याने 17 कुटुंबातील 64 लोकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी आश्रय दिला आहे. अहेरीचे माजी पं.स.सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, डॅा.मिताली आत्राम यांनी पूरग्रस्त भागात पाहणी करून पुरग्रस्तांना धान्याच्या किट देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आज शुक्रवारसाठी हवामान विभागाने ‘रेट अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केली आहे.

गुरूवारच्या पावसामुळे पर्लकोटा नदीवर पाणी चढल्यामुळे हेमलकसा ते भामरागड मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. इंद्रावती नदीत पाण्याचा दाब वाढत आहे. दिवसभरात ही स्थिती राहिल्यास पर्लकोटाचे पाणी भामरागड शहरात शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय सिरोंचा-असरअली- जगदलपूर या मार्ग वडधम गावाजवळ रस्त्यावर पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी 24 जुलैकरिता ऑरेंज अलर्ट दिला होता. दि.24 च्या सकाळी जिल्ह्यातील 15 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज 25 जुलैकरिता रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अत्याधिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चामोर्शीच्या तहसीलदारांना तालुक्यातील शाळा, अंगणवाड्याना आज सुटी जाहीर केली आहे.

​गडचिरोली जिल्ह्यासह नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठीही पुढील 24 तासांत रेड / ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना खालीलप्रमाणे काही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

​नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

1) ​पुराच्या पाण्यातून प्रवास करणे टाळावे. 2) ​कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 3) ​अतिवृष्टीच्या काळात नदी, तलाव, बंधारे इत्यादी ठिकाणांजवळ जाणे टाळावे. 4) ​पर्यटकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी आणि सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. 5) ​नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. 6) ​नदी/नाल्याच्या पुलावरून पाणी वाहात असताना कोणीही पूल ओलांडू नये.

​आपत्कालीन संपर्क क्रमांक

​आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी ​दूरध्वनी 07132-222031 / 07132-222035 किंवा ​मोबाईल : 9423911077 / 8275370208 / 8275370508 यावर संपर्क साधावा.

हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी केली पाहणी

बुधवारपासून सतत सुरू असलेल्या पावसाने आलापल्ली येथील फुकट नगरमध्ये अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. तेथील नागरिकांना प्रशासनाने आलापल्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नागरिक स्थलांतरित केले. पावसामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार यांनी गुरुवार (24 जुलै) माजी पंचायत समिती सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांना दिली. त्यानंतर हर्षवर्धनबाबा व डॉ.मिताली आत्राम यांनी आलापल्ली येथे धाव घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केले आणि नागरिकांशी संवाद साधला.

फुकट नगर कॉलनीत पाणी शिरल्याने घरातील साहित्य बेकार झाले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तेथील गोरगरीब नागरिकांना धान्याच्या किट देणार असल्याचे हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी म्हटले आहे. तसेच दि.25 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सर्वांनी सावधगिरी बाळगून जीवाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी केले आहे.