बेडगाव घाटातील अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली दमकोंडी

टोल वाचवण्यासाठी शॅार्टकट

गडचिरोली : कुरखेडा ते कोरची मार्गावरील बेडगावच्या घाटात रविवारच्या मध्यरात्री एक ट्रक नादुरूस्त होऊन रस्त्यातच फसल्याने तब्बल 12 तासांपेक्षा अधिक काळाची वाहतूककोंडी झाली. यात एका गरोदर महिलेसह अनेकांना चांगलाच शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.

दक्षिणेकडील राज्यातून छत्तीसगडकडे कच्चा माल घेऊन जाणारे आणि तिकडून पक्का माल घेऊन येणारे ट्रक टोल टॅक्स आणि ओव्हरलोडचा दंड वाचविण्यासाठी कोरची, बोटेकसा मार्गे छत्तीसगडकडे जातात. त्यात बेडगावच्या घाटात चढ-उताराचा आणि अरूंद रस्ता असल्याने वाहनांधारकांना येथून गाडी काढताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात ओव्हरलोड गाडी अनेक वेळा बंद पडते. यातूनच रविवारच्या रात्री एक वाहन घाटात बंद पडले. त्यामुळे मागून येणारी सर्व वाहने अडकून पडली. विशेष म्हणजे त्या ठिकाणी वाहन माघारी पलटवण्यासाठी जागाच नसल्याने अनेक मालवाहून वाहनांसह प्रवासी वाहने अडकून पडली होती. त्यामुळे नागरिकांना अनेक तास वाहनातच अडकून पडावे लागले.

भिलाईसह इतर स्टिल प्लान्टमधील माल चंद्रपूर, तेलंगणा, कर्नाटक कडे घेऊन जाणाऱ्या वाहनांची वर्दळ पाहता या ठिकाणी रस्ता रुंद करावा किंवा जड वाहनांना प्रवेश नाकारावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.