गडचिरोली : वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेत सामाजिक सुरक्षा व संरक्षणाचे भान ठेवून येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, तसेच लिटल प्लॅटिनम या शाळेने सर्व शिक्षक तथा कर्मचारी वर्गाकरिता दुचाकीसाठी हेल्मेट आणि चारचाकी वाहनासाठी सीट बेल्ट लावणे अनिवार्य केले आहे. नवीन वर्षाच्या (2026) सुरूवातीपासून या नियमांचे काटेकोर पालन करणे सक्तीचे केले आहे. या निर्णयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी स्वागत करत या शाळेचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन केले.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळेने ज्या कर्मचाऱ्यांकडे हेल्मेट नव्हते, अशा दुचाकी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटसुद्धा पुरवले आहे. तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा सुरक्षिततेच्या नियमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतो, त्यामुळे आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती घराबाहेर दुचाकीने किंवा चारचाकीने बाहेर पडत असेल तर त्यांना हेल्मेट व सीट बेल्ट लावण्याकरिता प्रेरित करावे आणि हेल्मेट किंवा सीट बेल्ट लावल्याशिवाय घराबाहेर पडू देऊ नये. शक्य असल्यास आपण आपल्या पॉकेट मनीमधून आपल्या कुटुंबातील व्यक्तींना एखादे हेल्मेट गिफ्ट करावे, असेही आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
“सावधानी हटी दुर्घटना घटी” ही म्हण आपल्या कुटुंबीयांना लागू पडू नये याकरिता सावधानता बाळगणे गरजेचे आहे. यासाठी वाहने हळू चालवणे, हेल्मेट लावणे, तसेच दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती न बसवणे याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती हेल्मेट किंवा सीट बेल्ट न लावता घराबाहेर पडणार नाही, असा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्याने करावा. नवीन वर्ष साजरे करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
डिसेंबर महिन्यामध्ये रस्त्यावरील अपघातामध्ये एका शाळेच्या शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व मोटर वाहन निरीक्षक किरण शिंदे यांच्यातर्फे सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट लावण्याकरिता अनिवार्य करण्याची सूचना केली होती. ज्यामध्ये प्लॅटिनम जुबिली स्कूलच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट लावणे अनिवार्य करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. या बाबतीत जिल्ह्यात प्लॅटिनम जुबिली स्कूल एक आदर्श शाळा ठरली आहे, असे प्रतिपादन आरटीओ किरण मोरे यांनी केले.
संस्थेचे महासचिव अझिझ नाथानी यांनी सांगितले की, सामाजिक सुरक्षा व संरक्षण या बाबीकडे विशेष लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. जर प्रत्येक व्यक्तीने सुरक्षिततेचा ध्यास घेऊन हेल्मेट व सीट बेल्ट वापरणे सुरू केले, तर अनेक कुटुंबांचे दुःख व हानी टाळू शकते. हा नियम कर्मचाऱ्यांनी आपल्यापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक जाणीव लक्षात घेऊन सर्वसामान्य जनतेला जागरूक करावे. शाळेचा हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श ठरेल, असे ते म्हणाले.
































