गडचिरोली : धानोरा तालुक्यातल्या चातगाव येथील डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजच्या काही विद्यार्थींनी डॅा.प्रमोद साळवे यांच्याविरोधात केलेली विनयभंगाची तक्रार निराधार असून त्यात तथ्य नसल्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने शिक्कामोर्तब केले. या तक्रारीमुळे आपल्याला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. पण न्यायालयाकडून योग्य न्याय मिळाल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया डॅा.प्रमोद साळवे यांनी दिली. आपले चारित्र्यहनन करण्यासाठी
काही स्वनामधन्य मठाधिशांनी काही मुलींना हाताशी धरून खोडसाळपणे त्या तक्रारी केल्या होत्या, असे डॅा.साळवे यांनी आधीच स्पष्ट केले होते. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून गडचिरोली पोलिसांनी जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला होता. त्या खटल्याचा 21 डिसेंबर 2019 रोजी आणि 9 मे तथा 20 मे 2024 रोजी निकाल लागला. त्यात न्यायालयाने डॅा.प्रमोद साळवे यांना पूर्णत: निर्दोष मुक्त केले. दरम्यान त्या निकालाविरूद्ध संबंधित मुलीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात अपिल केले. त्याचा निकाल 22 आॅक्टोबरला लागला. त्यात जिल्हा न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत डॅा.साळवे यांना निर्दोष ठरविण्यात आले.
या खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयात डॅा.साळवे यांच्या वतीने अॅड.चंद्रराज पांडे यांनी, तर उच्च न्यायालयात अॅड.राजेंद्र डागा यांनी काम पाहिले.