मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 61 जणांचे ऐतिहासिक आत्मसमर्पण

पोलिसांना 1 कोटींचे बक्षीस जाहीर

गडचिरोली : गडचिरोली आणि महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे नक्षल आत्मसमर्पण बुधवारी (दि.15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी साडेपाच कोटीहून अधिक बक्षीस असलेला नक्षल चळवळीतील वरिष्ठ नेता भूपती उर्फ सोनू उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपाल राव याच्या नेतृत्वात अनेक जहाल माओवाद्यांसह एकूण 61 जणांनी आपल्या बंदुका सोपवून आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या कामगिरीसाठी गडचिरोली पोलिसांना 1 कोटी रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

ही माओवादाच्या समाप्तीची सुरुवात असून माओवाद 100 टक्के हद्दपार होणार, अशा परिस्थितीत आज आपण पोहोचलो असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा करत आहे, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा मुद्दा असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

आत्समर्पण करणाऱ्यांमध्ये माओवादी केंद्रीय समितीच्या दोन डिकेएसझेडसी सदस्य, 10 डिव्हीसीएम दर्जाचे वरीष्ठ कॅडरचा समावेश आहे. त्यांनी 54 बंदुकांसह माओवादी गणवेशात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यांना संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल, केंद्रीय रिझर्व पोलीस बलाचे उपमहानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, माजी खासदार डॅा.अशोक नेते, माजी आ.डॅा.देवराव होळी आदी उपस्थित होते.

लॅायड्स मेटल्समध्ये प्रशिक्षण व नोकरी

आत्मसमर्पण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी संविधानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. “संविधानाचा आदर करेल, त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल, असा संदेश आम्ही आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनातून देऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, “प्रत्येकाचे उचित पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही” अशी ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्यांना लॅायड्स मेटल्सतर्फे प्रशिक्षण देऊन नोकरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्‍यांनी लॅायड्स व्यवस्थापनाचे कौतुक केले. आता आत्मसमर्पण करणाऱ्यांनाही कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या नोकरीचा मार्ग सुकर करण्याची ग्वाही लॅायड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरण यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 61 माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना पुनर्वसनासाठी एकत्रितपणे एकूण 3 कोटी 1 लाख 55 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास आणि रोजगार

गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येत असून, हा जिल्हा ‘स्टील मॅग्नेट’ बनत आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना 90 टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात आहे. 1 लाख स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. गडचिरोलीत इन्फ्रास्ट्रक्चर उभारताना जल, जमीन, जंगल यांचा नाश होऊ नये यासाठी 5 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात गडचिरोलीला देशाचा ग्रीन स्टील हब तयार करण्यासाठी योजना आखल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

2021 पासून 314 माओवाद्यांवर कारवाई

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रास्ताविकातून माहिती देताना, 2021 पासून आतापर्यंत 140 माओवाद्यांना अटक करण्यात आली, 81 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर 93 जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सांगितले. यावेळी नक्षलपीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश यांनी उपस्थितांचे आभार मानले.