नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना लवकरच मिळणार होमगार्डपदाची ऑर्डर

माजी खा.अशोक नेते यांची गृहमंत्र्यांशी चर्चा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात 7 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या होमगार्ड पदाच्या 417 जागांच्या भरती प्रक्रियेतील 312 जागा रिक्तच ठेवून उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले नव्हते. यामुळे तेव्हापासून ताटकळत असलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खा.अशोक नेते यांना दिले.

2017 मधील होमगार्ड भरतीमधील उमेदवारांनी माजी खा.अशोक नेते यांना यासंदर्भातील निवेदन देऊन रिक्त असलेल्या जागा भरून 2017 ची अर्धवट असलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. 2017 ला होमगार्ड जिल्हा समादेशक कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जाहीरातीनुसार 417 जागा भरणे अनिवार्य असताना केवळ 105 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. उर्वरित 312 जागा भरल्याच नाही. तेव्हापासून त्या भरतीमधील उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत ताटकळत आहेत. अनेक गोरगरीब कुटुंबातील उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असताना त्यांचे आता वय निघून जात आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र द्यावे, अशी विनंती होमगार्ड भरतीमधील उमेदवारांनी केली होती.

मा.खा.अशोक नेते यांनी यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यावर ना.फडणवीस यांनी हा प्रश्न लवकरच निकाली लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे गेल्या 7 वर्षांपासूनची उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार आहे.