गडचिरोली क्षेत्रात आज व उद्या गृहमतदान, 157 मतदारांसाठी 21 मतदान पथकं सज्ज

आरमोरीत 101 वर्षाच्या आजीचे मतदान

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील 117 मतदार आणि 40 दिव्यांग मतदार अशा एकूण 157 मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरून मतदान करण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. रविवार दिनांक 10 आणि सोमवार 11 नोव्हेंबर रोजी गृहमतदानासाठी मतदान पथके त्यांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. दरम्यान शनिवारी आरमोरी विधानसभा क्षेत्रात गृहमतदानाची प्रक्रिया करण्यात आली. यात देसाईगंजच्या 101 वर्षीय ताराबाई शेंडे या आजीबाईसह अनेक वृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदान सुविधेचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजावला.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे. यात एकूण 3 लाख 7 हजार 223 मतदार आहेत. यामध्ये 85 वर्षांवरील 1 हजार 131 पुरुष आणि 1 हजार 746 महिला असे एकूण 2 हजार 877 मतदार आहेत. सेनादलातील 234 पुरुष व 7 महिला असे 241 मतदार आहेत. याशिवाय दिव्यांग मतदारांमध्ये 1 हजार 411 पुरुष, तर 984 महिला असे एकूण 2 हजार 395 दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांमध्ये अंध , कर्णबधिर, अस्थिव्यंग, अक्षम आदी मतदारांचा समावेश आहे. यापैकी ज्या 157 मतदारांनी 12-डी फॅार्म भरून अर्ज केला, त्यांना गृहमतदानाची सोय प्रशासनाने करून दिली आहे.

17 पथके जाणार मतदारांच्या घरी

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून 21 पथकांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात पथकात 21 केंद्राध्यक्ष, 21 मतदान अधिकारी तथा 21 सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश आहे. या 21 पैकी 17 पथके प्रत्यक्ष घरी जाऊन गृहमतदानासाठी मतदान कक्ष तयार करून मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. 4 पथके राखीव आहेत. गृहमतदानासाठी मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. गृह मतदान करणाऱ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर तसेच बीएलओ मार्फत घरी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

नगर परिषदेत प्रशिक्षण

टपाली मतपत्रिका शाखेचे पथक प्रमुख गडचिरोली नगर परिषदचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर हे आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर हे गृह मतदान व टपाली मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी लक्ष देत आहेत. यासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवार, दि.8 नोव्हेंबर रोजी गडचिरोली नगर परिषदेत प्रशिक्षण देण्यात आले.

लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे