आरमोरी : या भागातील शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ही माझी मनस्वी ईच्छा आहे. त्यासाठीच 20 वर्षांपूर्वी देसाईगंज (वडसा) येथील 1200 एकर जागा राखीव करून त्यावर गोवंशीय प्राण्यांचे संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी ऑस्ट्रेलियावरून दुधाळ गाई आणल्या होत्या. त्या प्रकल्पाला अद्याप मूर्त रूप आले नसले तरीही शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प होणे गरजेचे आहे. मात्र काही लोक त्या ठिकाणी एमआयडीसी उभारण्यासाठी प्रयत्न करतात. मी हे होऊ देणार नाही, त्या ठिकाणी गोवंशीय प्राण्यांचे संशोधन केंद्रच होईल, असा ठाम निश्चय ज्येष्ठ सहकार नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित यावर्षीच्या जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आरमोरी कृउबा समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक खिळसागर नाकाडे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि 51 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आरमोरी येथील जिल्हा बँकेच्या भरगच्च भरलेल्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अतिथी म्हणून आ.कृष्णा गजबे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, आरमोरी कृउबा समितीचे सभापती ईश्वर पासेवार, गडचिरोली कृउबा समितीचे सभापती शशिकांत साळवे, सत्कारमूर्ती खिळसागर नाकाडे आदी मंचावर विराजमान होते.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना अरविंद सावकार म्हणाले, आरमोरी ग्रामपंचायतला नगर पंचायत करण्याचा निर्णय फिरवून थेट नगर परिषद करताना काय कष्ट घ्यावे लागले हे मलाच माहित. या पहिल्या नगर परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष किंवा सभापतींनी प्रामाणिकपणे योगदान दिले. आता समृद्धी महामार्ग आरमोरीतून जाईल. रेल्वेचे कामही आरमोरीतूनच सर्वप्रथम सुरू झाले. एकूणच वाढत्या गरजेनुसार दळणवळणाची साधनं वाढत आहेत. देवावर वाहिल्या जाणाऱ्या फुलांचं निर्माल्य होते. इथल्या प्रत्येक माणसाचे आयुष्य त्या फुलांप्रमाणे सत्कारणी लागावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी सत्कारमूर्ती खिळसागर नाकाडे यांच्या योगदानाची माहिती दिली. याशिवाय आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची निवड सार्थकी लावल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले. आ.कृष्णा गजबे यांनी सावकारांनी आपल्याला बोट पकडून राजकारणाच्या वाटेवर चालायला शिकवलं. सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी त्यांची नेहमीच तळमळ असते. विकास कामांना गती देण्यासाठीच त्यांनी आरमोरीला ग्रामपंचायतवरून थेट नगर परिषद केल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा गौरव पुरस्काराचे मानकर खिळसागर नाकाडे, आकाशवाणीवर लोकसंगीत गायक म्हणून मान्यता मिळालेले नवनाथ धाबेकर, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे यांनी आपल्या मनोगतातून सावकारांच्या परीस्पर्शाने माणसाच्या जीवनाचे कसे सोने होते, हे स्वानुभवातून सांगितले.
या कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत सुरेख संचालन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी तर आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले.
यांचाही झाला सत्कार
यावेळी अरविंद सा.पोरेड्डीवार, प्रकाश सा.पोरेड्डीवार आणि आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी आणि लोकसंगीत गायक नवनाथ धाबेकर, आरमोरीचे प्रथम नगराध्यक्ष पवन नारनवरे, माजी उपाध्यक्ष हैदर पंजवानी, माजी पाणी पुरवठा सभापती विलास पारधी, माजी आरोग्य सभापती सागर मने, माजी महिला व बालकल्याण सभापती सुनिता चांदेवार, माजी नगरसेवक मिथुन मडावी, गीता सेलोकार, सुनिता मने, प्रगती नारनवरे आदींचा शाळ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थितांना अयोध्येतील साहित्याची भेट
जिल्हा बँकेचे संचालक व काही रामभक्त नुकतेच अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी बँकेच्या हितचिंतकांसाठी तेथून आणलेले साहित्य कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना भेट म्हणून देण्यात आले. त्यात रामनाम मुद्रित असलेला दुपट्टा, रामलल्ल्याच्या मूर्तीचा फोटो आणि मनगटावर बांधण्याचा धागा अशा साहित्याचा समावेश होता.