देसाईगंज : देशाचे रक्षण करण्यासाठी सैन्यदलात सेवा देणाऱ्यांचा गावकऱ्यांसह सर्वांनाच अभिमान असतो. कुरखेडा तालुक्यातील तळेगावचे सुपूत्र असलेले हवालदार डिसेज जयलालजी वालदे हे १७ वर्ष सेन्यदलात सेवा दिल्यानंतर निवृत्त झाले. यानिमित्त देसाईगंजमध्ये त्यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी आ.कृष्णा गजबे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि देसाईगंज, कुरखेडा, आरमोरी तालुक्यातील अनेक आजी-माजी सैनिक, जेसीओ उपस्थित होते.
हवालदार डिसेज वालदे यांनी १७ वर्षाच्या कार्यकाळात देशातील विविध राज्यात सेवा दिली आहे. ते याच महिन्यात सैन्यदलात हवालदार या पदावरून निवृत्त झाले आहेत. गावाच्या सुपुत्राने देशाचे रक्षण केल्याचा त्यांचे मूळ गाव तळेगाव येथील नागरिकांना अभिमान असल्याने त्यांचा आदर्श शहरातील व गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा आणि सेवानिवृत्त सैनिकाप्रती तथा भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या तमाम सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्याचे माजी सैनिक संघटना काटोल व गडचिरोली यांनी ठरविले होते. त्यामुळे दि.१९ ला देसाईगंज येथील राजेंद्र वॉर्ड, आशीर्वाद कॉलनी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
वालदे यांची सेवा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद- आ.गजबे
यावेळी आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी डिसेज वालदे यांचा सत्कार करून त्यांची पुढील कारकीर्द आरोग्यदायी, आनंददायी जावो अशा शुभेच्छा दिल्या. आपल्या देशात घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असतात. मात्र देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना कुठलाही सण नाही की उत्सव नाही, देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते. डिसेज वालदे यांची देशसेवा आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे आ.गजबे म्हणाले.
यावेळी भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, कुरखेडा भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कुरखेडाचे नगरसेवक अॅड.उमेश वालदे, सैन्यदलातील पदाधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक संघटना काटोल व गडचिरोली येथील पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.