विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील वसतिगृह अधीक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करा

आ.डॅा.देवराव होळी यांची विधानसभेत मागणी

गडचिरोली : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील १६६ वसतिगृह अधीक्षकांना ४२०० रुपये ग्रेट पे या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन या वसतिगृह अधीक्षकांना ४२०० रुपये ग्रेट पे लागू करण्यात यावा, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॅा.देवराव होळी यांनी सोमवारी विधानसभेत केली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रम शाळांमधील वसतिगृह अधीक्षकांना ग्रेट पे देण्यासंदर्भामध्ये वारंवार न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने १५० लोकांना ग्रेड पे देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. मात्र अजूनही १६६ वसतिगृह अधीक्षकांना सदर लाभ मिळालेला नाही. यासंदर्भात वारंवार न्यायालयाकडून आदेश आणण्यासाठी वाट पाहिली जात आहे हे योग्य नाही. त्यामुळे या वसतिगृह अधीक्षकांना लवकरात लवकर सदर ग्रेट पे चा लाभ देण्यात यावा, अशी मागणी डॅा.होळी यांनी करत विधानसभेत सभागृहाचे लक्ष वेधले.