अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश

बैठकीत कोण काय म्हणाले, वाचा

गडचिरोली : जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक शुक्रवारी (दि.30) जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. प्रशासनातील अधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक नागरिकांनी या बैठकीत सहभाग घेत आपआपल्या सूचना आणि मते मांडली. रस्ते अपघातांच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे तातडीने करता येणाऱ्या अल्पकालीन व दीर्घकालीन व्यापक उपाययोजनांमध्ये नागरिकांच्या सूचना, अनुभव विचारात घेऊन त्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी स्पष्ट केले. (सविस्तर बातमी खाली वाचा)

बैठकीत अपघात नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. आमदार डॉ.मिलींद नरोटे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ यासारख्या गंभीर अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा नियोजन विकास निधीतून अपघातप्रवण स्थळांवर सुधारणा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांची माहिती विचारण्यात आली व आगामी आठवड्याभरात संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्त संस्थेमार्फत चौकशी केली जाणार आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि माहितीच्या आधारे प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून उपाययोजना निश्चित करण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

अशा होत्या नागरिकांच्या सूचना

या बैठकीत नागरिकांनी आपल्या अभिप्रायांतून अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. शहरातील वाढती जड वाहतूक रोखण्यासाठी रिंग रोडची आवश्यकता, रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी आणि शालेय वेळात शहरातील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद ठेवणे, मोठ्या इमारतींसाठी स्वतंत्र पार्किंगची सक्ती, रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविणे, वनक्षेत्रातील रस्त्यांवर वाहन चालकांना सावध राहण्याबाबत फलक लावणे, झाडांची छाटणी करणे, गतिरोधक बसवणे, दारू सेवन करून वाहन चालवणाऱ्यांवर नियमित कारवाई करणे, बस स्थानकाजवळ यू-टर्न बंदी, महामार्गालगत ट्रकसाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करणे, दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती, रस्त्यावरील भटक्या जनावरांची व्यवस्था, चामोर्शी येथील मुख्य रस्त्यावरील बस थांबा स्थलांतरित करणे, गडचिरोली-आरमोरी मार्गावरील खड्डे बुजवणे, तसेच आरमोरी शहरात वाहनांची गती कमी करण्यासाठी गतिरोधकाचे काम करणारे रिव्हर्स ट्रिप लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.

आमदार डॉ.मिलींद नरोटे यांनी देखील शहरातील काही भागात गती मर्यादा लागू करणे, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर कठोर कारवाई, पार्किंग सुविधा निर्माण करणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे, चामोर्शी येथील बस स्थानकाचे नियोजन, गडचिरोली आयटीआय व आष्टी येथील चौकांमध्ये वाहतूक सिग्नल लावणे तसेच एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जून महिन्यापासून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ व हेल्मेट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मोठ्या कंपन्यांकडून नेमण्यात आलेल्या खाजगी वाहनचालकांची नियमित तपासणी, वाहनचालक मद्यसेवन न करता वाहन चालवत आहेत याची खात्री करणे, सीसीटीव्ही कॅमेरे व ट्राफिक सिग्नलची संख्या वाढवणे याबाबतही उपाययोजना राबविल्या जातील. जिल्ह्यातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत अपघाताचे प्रमाण नियंत्रणत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांनी बैठकीत माहिती देताना 353-सी व 130-डी या राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात झाल्याचे निदर्शनास आणले. विशेषतः 25 ते 35 वयोगटातील तरुण, संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत अपघातांना अधिक बळी पडत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात एकही ‘ब्लॅक स्पॉट’ नाही

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांनी समितीपुढे सादरीकरणाद्वारे उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी ‘ब्लॅक स्पॉट’ संदर्भात चर्चा झाली. सध्या जिल्ह्यात केंद्र शासनाच्या निकषांनुसार एकही अधिकृत ‘ब्लॅक स्पॉट’ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र 10 जानेवारी 2025 रोजी झालेल्या बैठकीतील सुचनेनुसार 31 अपघातप्रवण स्थळांची संयुक्त पाहणी करण्यात आली होती. या स्थळांवरील सुधारणा व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे व त्यातून प्रस्तावित कामे सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. ही कामे येत्या 8 ते 10 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यंत्रणेला दिले.

बैठकीच्या शेवटी जिल्ह्यातील अपघात नियंत्रणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांचे प्रतिनिधी, पत्रकार यांनीही सक्रिय सहभाग घेतला व आपली मते नोंदविली. बैठकीला पोलीस, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागाचे व रस्ता सुरक्षेशी संबंधित अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.