संततधार पावसाने पुन्हा वाढविले टेन्शन, आरमोरीत पडझड, अनेक मार्ग बंदच

सहाव्या दिवशी पावसाची रिपरिप सुरूच

गडचिरोली : सलग चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप बुधवारी थांबेल असा अंदाज खोटा ठरवत पावसाने पाचव्याही दिवशी पुन्हा जोरदार एन्ट्री केली. बुधवारी गडचिरोली शहरात दुपारी सुरू झालेला जोरदार पाऊस सायंकाळपर्यंत बरसत होता. त्यानंतरही रिमझिम वर्षाव सुरूच होता. त्यामुळे आधीच गोसीखुर्दच्या पाण्याने निर्माण झालेल्या पुरात भर पडली. एवढेच नाही तर अनेक सखल भागात पाणीही साचले होते. दरम्यान आरमोरीत संततधार पावसामुळे काही घरांची पडझड झाली. भामरागडच्या पर्लकोटा नदीवर पुन्हा पुराचे पाणी चढल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.

आरमोरीतील नुकसानीची आ.गजबे यांच्याकडून पाहणी

सततच्या पावसाचा फटका आरमोरीतील अनेक घरांना बसला. मंगळवारी आमदार कृष्णा गजबे यांनी शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधुन पडझड झालेल्या घरांचे पंचनामे लवकर करून शासकीय मदत देण्याच्या सूचना केल्या. यावेळी शहरातील नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतही त्यांनी केली.

यावेळी आरमोरी तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, भाजपचे शहर तालुकाध्यक्ष विलास पारधी, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष अक्षय हेमके आदी उपस्थित होते.