जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात 14 हजार 951 कुटुंबांना मिळणार हक्काचे घरकुल

टप्पा-1 च्या घरकुलांचा बुधवारी गृहप्रवेश

गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात (ग्रामीण) गडचिरोली जिल्ह्यात 14 हजार 951 कुटुंबांना घरकुलांचा लाभ दिला जाणार आहे. 2024-25 या वर्षाकरिता केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने तशी मंजुरी दिली आहे. याशिवाय पहिल्या टप्प्यातील घरकुलांचा चावी वितरण आणि ई-गृहप्रवेश प्रतिनिधीक स्वरूपात येत्या बुधवार, दि.17 रोजी जिल्हा नियोजन सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे.

सन 2023-24 व 2024-25 मध्ये ज्या घरकुलांना मंजुरी मिळाली त्यांची घरकुले आता पूर्णत्वास येत आहेत. अनेकांची घरकुले पूर्णही झाली आहेत. त्यांना प्रतिनिधीक स्वरूपात घरकुलाची चावी देऊन ई-गृहप्रवेश दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आॅनलाईन स्वरूपात देशभरात एकाच वेळी होणार आहे.

भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने 2024-25 या वर्षाकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याकरिता 14 हजार 951 एवढे उद्दिष्ट दिले आहे. याअंतर्गत दिनांक 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता ऑनलाइन वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार यांनी केले आहे.