कोंढाळ्याच्या मेंढा घाटातून हजारो ब्रास रेती गायब, रात्रीस चाले वाहतुकीचा खेळ

यंत्रणांनी झाकले डोळे, तस्कर शिरजोर

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह इतर अनेक नद्यांमधून सध्या रात्रीच्या अंधारात रेतीची तस्करी केली जाते. पण त्यातल्या त्यात कोंढाळा येथील वैनगंगेचा घाट रेती तस्करीसाठी चांगलाच कुप्रसिद्ध झाला आहे. सध्या मेंढा घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करीचा खेळ सुरू असून हजारो ब्रास रेती गायब झाल्याचे दिसून येते. मात्र असे असताना महसूल यंत्रणेसह कारवाईचे अधिकार असलेल्या सर्वच यंत्रणांनी डोळे झाकून घेतले आहे. किती लुटायचे तेवढे लुटा, आम्ही पाहणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काही गब्बर तस्कर यात गुंतले आहेत. महसूल यंत्रणेला खिशात ठेवल्याप्रमाणे त्यांचा तोरा असतो असे सांगितले जाते. त्यामुळे आपले कोणीच काही बिघडवू शकणार नाही या विश्वासाने ते कोणालाही न जुमानता रेतीचा उपसा करून वाहतूक करतात. या घाटावर भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी पडलेला भलामोठा खड्डा पाहून किती रेती काढण्यात आली याचा अंदाज येतो. रेती वाहतुकीतील वाहनांच्या चाकांचे ताजे ठसे त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात.

प्राप्त माहितीनुसार, रात्रीच्या वेळी बाहेरगावातील ट्रॅक्टर कोंढाळ्याच्या या मेंढा घाटावर दाखल होतात आणि पहाटेपर्यंत रेतीची लूट करून वाहतूक केली जाते. महसूल यंत्रणेने जणूकाही खुलेआम सूट दिली आहे याप्रमाणे कोणाचीही भिती न बाळगता चालणाऱ्या या रेती चोरीतून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडण्यासोबत पर्यावरणाचीही मोठी हाणी झाली आहे.

यापूर्वी देसाईगंजच्या तहसीलदारांनी रेती वाहतूक रोखण्यासाठी मार्गात खड्डे करून ठेवले होते. पण त्याला न जुमानता रेतीची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची ती कारवाई थातूरमातूर होती की काय, अशी शंकाही निर्माण होत आहे.

कारवाई सुरूच, पुढेही करणार

दरम्यान यासंदर्भात देसाईगंजच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर यांना विचारले असता मेंढा घाटावरील रेती चोरी रोखण्यासाठी कारवाया सुरूच असतात. मात्र रेती चोरीला पूर्णपणे आळा घालणे शक्य झालेले नसल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र आमच्या कारवाया पुढेही सुरूच राहतील, असे त्यांनी सांगितले.