गडचिरोली : भामरागड पंचायत समितीअंतर्गत विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत गडबड करत एकाच कंत्राटदाराला 6 कोटींची कामे वाटल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. विशेष म्हणजे 1 मार्च 2026 रोजी शासकीय सुटी असताना ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी धर्मरावबाबा यांनी केली आहे.
यासंदर्भात आ.आत्राम यांनी जि.प.सीईओ सुहास गाडे यांच्याकडे पुराव्यांसह लेखी तक्रार केली. आदीम जमातीचे संरक्षण तथा विकास कार्यक्रमांतर्गत भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतअंतर्गत कियर येथे बंदिस्त नाली बांधकामाचे कंत्राट माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत उर्फ शुभम कुत्तरमारे यांना देण्यात आले आहे. शुभम कुत्तरमारे हे यापूर्वी सरपंच व ग्रामसेवकाला मारहाण प्रकरणी चर्चेत आले होते. याशिवाय त्यांच्यावर अॅट्रॅासिटी अॅक्टनुसार गुन्हाही नोंद झाला होता. आता बीडीओ, अभियंता यांच्याशी संगनमत करून कामे पदरात पाडून घेतल्याप्रकरणी ते वादात सापडले आहे.
या पद्धतीने झालेली निविदा प्रक्रिया ही महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968 आणि सार्वजनिक बांधकाम लेखा संहितेमधील तरतुदींचे सरळसरळ उल्लंघन असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित बीडीओ आणि अभियंत्याला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे.
































