Home दैनंदिन बातम्या आरमोरीकरांना चढणार क्रिकेटचा ज्वर, एपीएल-2026 चे उद्घाटन

आरमोरीकरांना चढणार क्रिकेटचा ज्वर, एपीएल-2026 चे उद्घाटन

प्रकाश सावकार, गजबे यांची उपस्थिती

आरमोरी : रात्रकालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आरमोरी प्रीमियर लीग (APL-2026)चे उद्घाटन 19 मार्च रोजी गुरुवारी सायंकाळी 5 वाजता हितकारिणी विद्यालयाच्या पटांगणावर, बर्डी येथे संपन्न झाले. याप्रसंगी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, तर अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णा गजबे होते. प्रकाश सावकार यांनी फित कापून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले. याप्रसंगी दिलेल्या छोटेखानी भाषणात ते म्हणाले, “खेळ हे तरुणांच्या ऊर्जेचे सकारात्मक माध्यम आहे. अशा स्पर्धांमुळे आरमोरी शहरातील युवकांसाठी व्यसनमुक्ती आणि एकजुटीचे नवे पंख उमलतील. मी आयोजकांचे अभिनंदन करतो आणि स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मनापासून शुभेच्छा देतो,”

कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा गजबे यांनी दीपप्रज्वलन करून स्पर्धेला चालना दिली. आपल्या भाषणात ते म्हणाले, “आरमोरी प्रीमियर लीगसारख्या उपक्रमांमुळे शहरातील क्रीडा संस्कृती मजबूत होईल. युवकांनी खेळातून अनुशासन, संघभावना आणि यशाची प्रेरणा घ्यावी. ही आरमोरी प्रीमियर लिग चषक स्पर्धा आरमोरीकरांचा सन्मान वाढवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला आरमोरी नगरपरिषदेचे अध्यक्ष रुपेश पुणेकर, उपाध्यक्ष विलास पारधी, भाजपचे तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा सचिव तथा नगरसेवक भारत बावनथडे, बांधकाम सभापती शुभम निंबेकार, आरोग्य सभापती राहुल तितिरमारे, श्रीहरी कोपुलवार, नगरसेवक अक्षय धकाते, सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे, अमर बोबाटे, के.टी. किरणापुरे, सेवानिवृत्त तहसीलदार जे.डी. नार्देलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी.जे.कारकुरवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन व दीपप्रज्वलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि संघांचे सराव सामने झाले. या स्पर्धेचे आयोजन प्रकाश चषक आयोजन समिती, ए.पी.एल.आयोजन समिती आरमोरी व युवामंच यांनी केले आहे. या स्पर्धेत अनेक संघ सहभागी होत असून अंतिम सामन्यापर्यंत रंगतदार खेळ पाहायला मिळणार आहे.