‘लाडकी बहीण’चे अर्ज भरण्यासाठी मिळणार प्रतिअर्ज 50 रुपये भत्ता

दिरंगाई खपवून घेणार नाही- जिल्हाधिकारी

गडचिरोली : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्राम स्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे. नवीन बदलांसह या योजनेसंदर्भातील सुधारित शासन निर्णय शुक्रवारी (दि.12) काढण्यात आला. या कामाला गती येण्यासाठी अर्ज भरून घेणाऱ्या यंत्रणेला प्रोत्साहन म्हणून प्रतिअर्ज 50 रुपये याप्रमाणे भत्ताही मिळणार आहे. दरम्यान या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी सुरु असलेल्या नोंदणीचा शुक्रवारी व्हिडीओ कॅान्फरन्सिंगने राज्यातील यंत्रणेकडून आढावा घेतला. यावेळी गडचिरोली येथून जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, महिला व बालविकासच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले, बालविकास प्रकल्प अधिकारी (शहरी) ज्योती कडू आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यांतील सर्व महिलांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी जास्तीत-जास्त संख्येने नोंदणी करावी. अर्ज भरण्यासाठी सुधारित नमुना वापरावा, यासाठी कोणालाही पैसे देऊ नये, तसेच नोंदणीच्यावेळी आधार कार्डवरील नाव, पत्ता, आधार क्रमांक व बँकखाते आदी माहिती अचूकपणे नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले. आता पोस्ट (डाक) विभागाच्या बँकेतील बचत खातेही या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

यांना मिळणार 50 रुपये भत्ता

नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप / पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांची यशस्वीपणे नोंद झाल्यावर 50 रुपये प्रतिअर्ज याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.