गडचिरोली : देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन सोहळा जिल्हाभरात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करत या राष्ट्रीय सणानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
लॅायड्सतर्फे कोनसरी व सुरजागडमध्ये कार्यक्रम

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)ने शुक्रवारी कोनसरी प्रकल्प आणि सुरजागड लोहखनिज खाण येथे 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. दोन्ही ठिकाणच्या समारंभात गावातील मान्यवर आणि एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कोनसरी प्रकल्पात झालेल्या कार्यक्रमात कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे हे प्रमुख अतिथी होते. गावातील नागरिक नागोबाजी पेद्दापल्लीवार, अभिजित बंडावार, कोनसरी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला, स्थानिक आदिवासी बंधू-भगिनींनी पाहुण्यांचे पारंपरिक स्वागत केले. याप्रसंगी प्रकल्प सुरक्षा यंत्रणा, रस्ता सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन आणि सुरक्षा चमू, कॅम्प सेफ्टी या पथकांनी आणि कोनसरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी आणि शिस्तबद्ध संचलन केले. एलएमईएलने छिंदवाडा येथे वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या मुलींनीही संचलनात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात या चमूंची प्रशंसा केली. परेडचे निरीक्षण केल्यानंतर मान्यवरांनी विजेत्यांना विविध स्पर्धांसाठी बक्षिसे प्रदान केली आणि एलएमईएल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित केले.
सुरजागड लोहखनिज खाण येथे झालेल्या कार्यक्रमात गावातील गणमान्य नागरिक आणि एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी जे बलिदान दिले ते देशाच्या मागास भागाचा विकास व्हावा, आपल्याला स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी आहे. आजचा दिवस विद्यापीठाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स यांच्यातील झालेल्या करारानुसार युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 60 विद्यार्थी प्रवेशित आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाचे दालन खुलं व्हावं म्हणून आमच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेने अभियांत्रिकी शिक्षणाचा निर्णय घेतला आणि शासनानेही त्याला मान्यता दिली. सुरुवातीला आम्ही डिप्लोमा कोर्स सुरू केलाय. पुढे बी-टेक सारखे कोर्सेस सुरू करण्याचा आमचा मानस आहे. इथून विद्यार्थी शिकून बाहेर पडतील आणि जिल्ह्यातीलच कंपन्यांमध्ये त्यांना मोठ्या पदावर रोजगार मिळेल, असेही कुलगुरु डॉ.बोकारे म्हणाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे निवासी संचालक ले.कर्नल (नि.) विक्रम मेहता, तसेच प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ.श्याम खंडारे, डॉ.मनिष उत्तरवार, प्रविण पोटदुखे, भास्कर पठारे, विद्यापीठातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अमोल चव्हाण यांनी केले.
गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली

गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवकृपा कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली

शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तसेच डॅा.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) मा.खा.डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याशिवाय गडचिरोलीत विविध ठिकाणच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यांना डॉ.अशोक नेते यांनी उपस्थिती लावली.
शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात उत्साहाच्या वातावरणात डॉ.नेते यांच्या हस्ते तिरंगा फडकवून देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला. डॉ.नेते यांनी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांचे जनसंपर्क कार्यालय, कॅम्प एरिया येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय, गोकुळनगर येथील वीर बाबुराव शेडमाके शहीद स्मारक, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होऊन नागरिक, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांशी संवाद साधत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवसेना जिल्हा कार्यालय गडचिरोली

गडचिरोलीतील चामोर्शी मार्गावर असलेल्या शिवसेना जिल्हा कार्यालयात जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या हस्ते, विजय शृंगारपवार यांच्या अध्यक्षतेखाली झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील पोरेड्डीवार, शहर प्रमुख पप्पू शेख, संघटक गजानन नैताम, तालुकाप्रमुख कुणाल कोवे, युवा सेनेचे चेतन उरकुडे, अतुल नैताम, महिला आघाडीच्या मंगला बिरमवार, भारती मडावी, स्मिता नैताम, प्रशिक झाडे, नितीन निंबोरकर, निखिल कुजूर, सुलभ कावळे, चंदू शिडाम, नितीन टेकाम, निरंजन गव्हारे, अभिषेक मेश्राम, रोहित चिचघरे, कृष्णा पदा, रुचित चापले, पारस आलम, जय सोवासिया, चिरंजीव कुमरे, गौतम खोब्रागडे, शुभम बंडीवार, हिमांशू नांदगावे, यश मुक्कावार, संकल्प कोसारे आणि अनेक कार्यकरते उपस्थित होते.
ग्रीनलँड इंग्लिश मिडियम स्कुल, आलापल्ली
आलापल्लीच्या ग्रीनलँड इंग्लिश मिडियम स्कुलमधील कार्यक्रमात लता रंगुवार यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने देशभक्ती गीतांवर नृत्य, देशभक्तिपर गीतांचे गायन, पथनाट्य इत्यादि कार्यक्रम सादर करण्यात आले. शिक्षकांनी आपल्या भाषणांत क्रांतिकारक आणि महापुरुषांच्या जीवन चरित्रांवर, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील घटनांवर मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.जगन देवकर, सचिव सुरेश गड्डमवार, कोषाध्यक्ष मंगेश परसावार, मुख्याध्यापक जी.महेश, गावातील नागरिक, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.