

कुरखेडा : जो तिरंगी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने राष्ट्रीय सणांना सरकारी आणि खासगी कार्यालयांवर आणि अलिकडे घरांवरही फडकविला जातो, त्याचा कुरखेडा नगर पंचायतमध्ये चक्क कचऱ्यात फेकून अवमान करण्यात आला आहे. अत्यंत धक्कादायक आणि राष्ट्रप्रेमाला ठेच पोहोचवणारी ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मात्र ध्वजसंहिता बासनात गुंडाळून राष्ट्रध्वजाचा अवमान होताना उघड्या डोळ्यांनी पाहूनही अद्याप याप्रकरणी कोणावरही कारवाई झालेली नाही. (अधिक बातमी खाली वाचा)

ही घटना उघडकीस आली तेव्हा काही प्रत्यक्षदर्शींनी कचरागाडीत तिरंगी झेंडे पाहिले आणि ती छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) तालुका संघटक ईश्वर ठाकूर आणि शिंदेसेनेचे तालुका आरोग्य प्रमुख शहजाद हाशमी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नगर पंचायतच्या आवारात उभ्या असलेल्या कचरागाडीत आणि गाडीखाली विखुरलेल्या अवस्थेत पडलेले तिरंगी ध्वज पाहिल्यानंतर ते अनेक दिवसांपासून कचऱ्यात फेकलेले असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. ते तिरंगी ध्वज कधीचे आहेत, ते कचऱ्यात कोणी आणि केव्हा फेकले, एवढे दिवस ते तिथे पडून असताना त्याकडे कोणीच कसे लक्ष दिले नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन नगर पंचायत प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तिरंग्याचा अवमान करणाऱ्याला होते शिक्षा
तिरंग्याचा अवमान होणे हा कायद्याने गुन्हा आहे. ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, 1971’ च्या कलम 2 नुसार, भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करणे, जाळणे, नष्ट करणे किंवा कोणत्याही प्रकारे असन्मानाने वागवणे यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हा कायदा स्पष्टपणे सांगतो की, राष्ट्रीय ध्वजाला कोणत्याही प्रकारे अपमानित करता येणार नाही, मग तो सार्वजनिक ठिकाणी असो किंवा खाजगी. याशिवाय, जर चौकशीत निष्काळजीपणा सिद्ध झाला तर जबाबदार व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली कारवाई होऊ शकते.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
स्थानिक प्रशासनाने अद्याप याबाबत अधिकृत निवेदन दिलेले नाही, पण सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी सुरू झाली आहे. नागरिकांमधील रोष इतका आहे की, सोशल मीडियावर तिरंगा अवमानाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हे प्रकरण मोठ्या चौकशीचे स्वरूप घेईल का? की फक्त चौकशीचा दिखावा आहे? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
कुरखेड़ात युवकांचा संताप, आंदोलनाचा इशारा
मंगळवारी (दि.23) कुरखेडातील सर्वपक्षीय युवा कार्यकर्त्यांनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी, तहसीलदार, एसडीपीओ आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. येत्या दोन दिवसांत कडक कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एकीकडे ‘हर घर तिरंगा’ अभियानाने राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवला जात आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय बेजबाबदारपणामुळे तिरंग्याचा अपमान झाल्याने युवकांमध्ये संतापाची भावना आहे. निवेदन सादर करताना अनिकेत आकरे, ईश्वर ठाकूर, शहजाद हाशमी, दीपक धारगाये, लोकेंद्र शहा सयाम, मृणाल माकडे, प्रांजल धाबेकर, नागेश फाये, प्रशांत हटतवार, नितेश निरंकारी, आशिष तुलावी, शुभम ठाकरे, आशिष हुमने, यश सोनकुसरे, आकाश उईके आणि सुशील बेहेर यांच्यासह इतर सर्वपक्षीय युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांच्या या आक्रमक पवित्र्याने आता हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
































