‘त्या’ बालकांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाची समिती गठीत

अहेरीत शवपरिक्षण, धर्मरावबाबांकडून सांत्वन

गडचिरोली : वेळेवर वैद्यकीय उपचार न घेतल्याने पोटच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी गमवावे लागण्याची दुर्दैवी वेळ अहेरी तालुक्यातल्या येरागड्डा गावातील वेलादी दाम्पत्यावर आली. त्यात कहर म्हणजे त्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन अनेक किलोमीटरची पायपीट करत आपले गाव गाठले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या घटनेला अनेक कंगोरे असले तरी त्या बालकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यात कोणती मानवी चूक तर नाही ना, हे तपासण्यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी चौकशी समिती गठीत केली.

विशेष म्हणजे पायपीट करत गावी नेण्यात आलेले दोन्ही बालकांचे मृतदेह आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या मदतीने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून गुरूवारी शवपरिक्षण करण्यात आले. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रताप शिंदे यांच्यासह चौकशी समितीच्या सदस्यांनी तातडीने जिमलगट्टा गाठून सर्व घटनाक्रम जाणून घेतला. मुळात त्या दाम्पत्याला रुग्णवाहिका किंवा शववाहिका उपलब्ध करून देण्याअगोदरच, शवपरीक्षण टाळण्यासाठी त्या दाम्पत्याने मुलांचे मृतदेह घेऊन गावाची वाट धरल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले, असे डॅा.शिंदे यांनी सांगितले.

डॅाक्टरपेक्षा गावातल्या पुजाऱ्यावर, मांत्रिकावर जास्त विश्वास ठेवणे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अंगलट येत आहे. त्यातही काही तासात मृत्यू ओढवण्यामागे पुजाऱ्याने दिलेल्या जडीबुटीचा दुष्परिणाम तर नाही ना, किंवा इतर कोणता आजार आहे हेसुद्धा स्पष्ट होणे गरजेचे आहे. शवपरिक्षणाचा अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे.

नागरिकांनी आता अंधश्रद्धा ठेवू नये- ना.धर्मरावबाबा आत्राम

दरम्यान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृत मुलांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. याशिवाय त्यांना 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी नागरिकांनी अंधश्रद्धा ठेवून केवळ जडीबुटीवर विसंबून राहण्याचे दिवस आता संपल्याचे सांगत दुर्गम भागातही बऱ्यापैकी आरोग्य सुविधा, डॅाक्टर उपलब्ध झाल्याने त्याचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते बबलू हकिम, नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोणे, श्रीकांत मद्दीवार, संतोष तोरे, कैलास कोरेत, सांबय्या करपेत, संदीप ढोलगे आदी उपस्थित होते.