अहेरी : निविदा प्रक्रिया न करताच अहेरीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे आपल्या कार्यालयाला केलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाची सखोल चौकशी करून मनमर्जीपणे बांधकाम करणाऱ्या उपवनसंरक्षकासह अहेरी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी प्रधान सचिव(वने) यांना दिले आहे.
आलापल्ली वनविभागाअंतर्गत अहेरी वनपरिक्षेत्रात नियमबाह्य पद्धतीने निविदा प्रक्रियेच्या आधी संरक्षण भिंत आणि इतरही काही बांधकामे करण्यात आली. या बांधकामांची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत सखोल चौकशी करावी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना तातडीने निलंबित करावे, असे निवेदन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व प्रधान सचिव वने यांना भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी दिले. त्यानुसार प्रधान सचिव (वने) यांनी अहेरी वनपरिक्षेत्रात निविदा प्रक्रिया न राबवता बांधलेल्या वॅाल कंपाऊंड व अन्य बांधकामांची उच्चस्तरीय चौकशी लावली, आणि नियमबाह्य कामे करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. त्यानुसार प्रधान सचिव (वने) यांनी मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार यांना चौकशीचे आदेश दिले आहे.
अल्लापल्ली वनविभागाने 5 आॅगस्टला 11 कोटी 14 लाख रुपयांच्या निविदा काढल्या. यात एकुण 33 कामांचा समावेश आहे. यात 28 ते 33 क्रमांकाची कामे ही जिल्हा मजूर संस्थेमार्फत करण्याचे नमुद केले आहे. एकुण कामामधील 30 व्या क्रमांकाचे काम अहेरी वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सभोवताल संरक्षण भिंत तयार करण्याकरीता 27 लाख 56 हजार व वसाहत संरक्षण भिंतीसाठी 40 लाख 59 हजार रुपये किमत दाखविली आहे. वास्तविक या दोन्ही संरक्षण भिंती कोणत्याही प्रकारे निविदा प्रक्रिया न करता काढण्यात आल्या आहेत. आधी जवळच्या कंत्राटदारामार्फत बांधकाम करणे व नंतर निविदा प्रक्रिया राबविण्याचा उलटा प्रकार आलापल्लीचे वनसंरक्षक व अहेरीच्या वनपरिक्षेत्राधीकाऱ्यांनी करून पदाचा दुरुपयोग केला आहे. या शासकीय नियमावलीची अवहेलना केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे खरवडे यांनी सांगितले.