देसाईगंज : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान गौरव दिनाचे औचित्य साधत देसाईगंज येथील आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून ‘संविधान’ या शब्दाची प्रतिकृती रेखाटून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
याशिवाय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोंढाळा येथील विद्यार्थ्यांनी ‘घरोघरी संविधान’ कार्यक्रमांतर्गत गावात मोठी प्रभातफेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी बँडच्या तालावर संविधानाची पालखी घेऊन संपूर्ण गावातून फेरी काढत संविधानातील मूल्यांविषयी जनजागृती केली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने या प्रभातफेरीत सहभाग घेतला. फेरीच्या अग्रभागी काही विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रतीक असलेली सुंदर सजावट केलेली पालखी खांद्यावर घेतली होती.
या प्रभातफेरीमध्ये विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधानाचा बॅनर हातात घेऊन संपूर्ण गावाला फेरी घातली. ‘समता, बंधुता, लोकशाही : संविधानाशिवाय पर्याय नाही’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांचे लक्ष वेधले आणि त्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच गावातील मुख्य चौकात असलेल्या संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पारधी, मुख्याध्यापक योगेश ढोरे, शिक्षक टेंभुर्णे, सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे, नितेश पाटील, शिशुपाल वालदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
































