पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; अनेक कंपन्या येणार

गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन

गडचिरोली : रोजगाराचे मर्यादित पर्याय असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी नागपुरातील गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने येत्या 28 मार्चला गडचिरोलीत रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. धानोरा मार्गावरील सेलीब्रेशन हॅालमध्ये होणाऱ्या या मेळाव्यासाठी अनेक कंपन्या येणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड.अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात निर्मिती, आय.टी., ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग क्षेत्रातील राज्यभरातील जवळपास 40 नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. पदवी शिक्षण घेत असलेले आणि पदवीधर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचे शिक्षण ज्या क्षेत्रातील आहे, त्या क्षेत्राशी संबंधित कंपनी उमेदवारांच्या मुलाखती घेतील. थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्याच ठिकाणी उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान केले जाणार आहे.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 28 मार्च रोजी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. मेळाव्याच्या ठिकाणीसुद्धा विद्यार्थी आणि पालकांसाठी अभ्यागत कक्ष, नोंदणी कक्ष, माहिती कक्ष उभारण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पदवीधर बेरोजगारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार ॲड.अभिजित वंजारी यांनी केले आहे.