गडचिरोली : वाढते औद्योगिकरण, बनावट दारूमुळे वाढलेल्या आरोग्याच्या समस्या, लगतच्या जिल्ह्यांमधून सर्रास होणारा पुरवठा अशा सर्व पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील फसलेल्या दारूबंदीची चंद्रपूरप्रमाणे समीक्षा करण्यासाठी सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी तशी शिफारस करत यावर उचित कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्र आदिवासी व मागासवर्गीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष डॅा.प्रमोद साळवे आणि उपाध्यक्ष अॅड.संजय गुरू यांनी यासंदर्भातील एक निवेदन सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांना देऊन जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीमुळे युवा पिढीवर कसा दुष्परिणाम होत आहे याची माहिती त्यांना दिली होती. विषारी दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे या दारूबंदीची समीक्षा करण्याची मागणी त्यांनी केली होती. अॅड.जयस्वाल यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्या मागणीला बळ देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिफारस केली.
समाजहित लक्षात घेऊन सरकारने ही फसलेली दारूबंदी उठवावी आणि विषारी दारू तथा दारूच्या नशेत होणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॅा.साळवे आणि अॅड.गुरू यांनी केली आहे.