गडचिरोली : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर सी.पी.राधाकृष्णन यांनी बुधवारी पहिल्यांदाच गडचिरोलीला भेट दिली. गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आले असले तरी त्यांनी जास्तीत जास्त वेळ विश्राम भवनात विविध शिष्टमंडळाच्या भेटीसाठी दिला. विशेष म्हणजे राज्यपालांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित करण्याची पहिलीच वेळ होती. या भेटीत त्यांनी पत्रकारांच्या नजरेतून जिल्ह्यातील समस्या जाणून घेतल्या.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पत्रकारांशी विकासविषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन आणि प्रमुख उत्पादनांबाबत संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.
राज्यपाल राधाकृष्णन यांनी जिल्ह्यातील विकास कामांची व समस्यांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात सुरू असलेली आणि नियोजित विकास कामे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण, वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील समस्या, दुर्गम भागामध्ये मुलभूत पायाभूत सुविधा, उद्योगांच्या समस्या, वनउपज, तेंदूपत्ता साठवणूक, नक्षलवाद, वनकायद्यामुळे विकासात्मक कामांमध्ये येत असलेले अडथळे यासारखे विषय विविध शिष्टमंडळांकडून मांडण्यात आले.
जवळपास तीन तास राज्यपाल विश्राम भवनात होते. त्यामुळे त्यांचा हा दौरा सार्थकी लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.