चांभार्डा येथे रंगला कबड्डीचा रणसंग्राम, ग्रामीण युवकांच्या कौशल्याला चालना

हा निरामय जीवनाचा खेळ- कात्रटवार

गडचिरोली : पूर्वीच्या काळी कबड्डीचा खेळ खेड्यापाड्यात शारीरिक तंदुरूस्तीसाठी खेळला जायचा. आता ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात सुध्दा हा खेळ अतिशय लोकप्रिय होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे. या खेळामुळे शारीरिक व मानसिक तंदुरूस्ती बरोबरच निरामय जीवन प्राप्त होते. त्यामुळे युवकांनी मैदानी खेळावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केले.

शिवस्वराज्य क्रीडा मंडळ चांभार्डाच्या वतीने आयोजित ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटक म्हणून कात्रटवार बोलत होते. ग्रामीण भागातील युवकांच्या क्रीडागुणांना चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्या संघाला अरविंद कात्रटवार यांच्या वतीने 30 हजारांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

उपस्थितांना संबोधित करताना अरविंद कात्रटवार म्हणाले, प्रत्येक युवकात क्रीडा गुण असतात. त्याच्या गुणांना वाव देऊन योग्य ते मार्गदर्शन व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जगभरात क्रीडा क्षेत्राला महत्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात युवकांना आपले ‘करीअर’ घडविण्याची संधी आहे, त्यामुळे क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्या युवकांनी खेळावर लक्ष केंद्रीत केल्यास ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊ शकतात.

मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील युवकांच्या क्रीडा विकासासाठी मी कटीबध्द आहे. खेळाडूंना आवश्यक ती मदत भासल्यास सहकार्य करण्यास सदैव तत्पर असल्याचे कात्रटवार याप्रसंगी म्हणाले.

यावेळी सुरेश कोलते, लोमेश कुमरे, चेतन चिकराम, खुशाल मेश्राम, महेश लाजूरकर, पराग कुमरे, आदित्य सेलोकर, अंकुश झाडे, दीपक आभारे, प्रांजल कोलते, प्रतिक मसराम, मयूर भोयर, धनंजय चापले, सुरज चिकराम, राहुल हलामी, प्रफुल किरंगे, गौरव पाल, साहिल ठाकरे, लिकेश देशमुख, रुपेश आजबले, साहिल कोलते, अभिजित खेवले, प्रफुल चणेकार, मोहित लाजूरकार, अमित कोटगले, पंकज चनेकार, तन्मय कोटगले, संजय लडके, निशांत शेडमाके, वैभव रेचनकार यांच्यासह शेकडो शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते.