भ.बिरसा कला संगमची पूर्व विदर्भ विभागीय फेरी उत्साहात

आदिवासी विकासमंत्र्याची उपस्थिती

गडचिरोली : येथील संस्कृती सभागृहात भगवान बिरसा कला संगमाची पूर्व विदर्भ विभागीय फेरी अत्यंत उत्साहपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाली. या विभागीय फेरीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, विभाग संघचालक जयवंत खरवडे, प्रशांत बोफुर्डीकर आणि महाराष्ट्र आदिवासी सेलचे मीडिया प्रमुख अक्षय उईके प्रमुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी विकासमंत्री प्रा.उईके आपल्या भाषणात म्हणाले, “आदिवासी समाजाची परंपरा, कलागुण आणि संस्कृती ही आपली ओळख आहे. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. कलागुणांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस प्रयत्न करणे हीच खरी आदरांजली आहे.”

प्रारंभी अक्षय उईके यांनी प्रास्ताविकात “भगवान बिरसा कला संगम” या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्दिष्ट, वैशिष्ट्य आणि आदिवासी कलावंतांना मिळणारे व्यासपीठ याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या स्पर्धेची पहिली फेरी ऑनलाइन, तर दुसरी फेरी पूर्व विदर्भ विभागीय फेरी गडचिरोली येथे पार पडली. अंतिम राज्यस्तरीय फेरी 14 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.

याप्रसंगी माजी खासदार डॉ.अशोक नेते यांना 14 नोव्हेंबरला नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम फेरीस उपस्थित राहण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले. तसेच 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अंतिम निकाल सोहळ्यासही डॉ. नेते यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे, अशी विनंती आदिवासी विकासमंत्री प्रा. उईके यांनी केली.

कार्यक्रमाचा समारोप “जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताने झाला. संपूर्ण कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचा अभिमान, एकात्मतेचा संदेश आणि कलावंतांच्या सृजनशक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.