आष्टी ः कोनसरी येथे उभारण्यात आलेल्या लोह प्रकल्पाचे पहिले युनिट लवकरच सुरू होणार आहे. अशा स्थितीत कुशल मनुष्यबळासोबत इतर सर्व कामांसाठी प्रकल्पग्रस्त नागरिक आणि कोनसरी ग्रामपंचायतमधील रहिवासी असलेल्या नागरिकांना कंपनीकडून प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास आणि अपेक्षा कोनसरी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. प्रकल्प असेल तरच नोकऱ्या मिळतील, त्यामुळे आमची ग्रामपंचायत ठामपणे या प्रकल्पाच्या पाठिशी असून इतर ग्रामपंचायती आणि सर्व प्रकल्पग्रस्तांनीही या लोहप्रकल्पाच्या उभारणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच श्रीकांत पावडे आणि ग्रामपंचायतच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सुरवातीपासूनच कोनसरी येथील नागरिक हा प्रकल्प आपल्या परिसरात व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्नशिल होते. ज्यावेळी लॅायड मेटल अॅन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीला प्रकल्पासाठी जागा हवी होती त्यावेळी कोनसरी परिसरातील गावांनी जमिनीचे दर 10 ते 15 लाख रुपये एकर याप्रमाणे मागितले. त्यामुळे कंपनीने इतरत्र जागा बघण्यास सुरवात केली. अशा वेळेस हा प्रकल्प आपला परिसर सोडून इतर कुठल्याही ठिकाणी जाऊ नये व आपल्या परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, या उद्देशाने कोनसरी गावातील शेतकऱ्यांनी कंपनीने ठरविलेल्या दराप्रमाणे, म्हणजेच 5 लाख रुपये प्रतिएकर या दरात कंपनीला जमिनी दिल्या. त्यामुळे हा प्रकल्प कोनसरी गावात उभा राहीला. आता कोनसरी परिसरातील सुशिक्षित, कुशल, अकुशल बेरोजगारांना प्रत्यक्ष रोजगार मिळण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे यात कोनसरीतील भूमिधारक शेतकरी व गावातील स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार मिळायला पाहिजे, त्यानंतर कोनसरी परिसरातील इतर ग्रामपंचायतमधील बेरोजगारांना रोजगार द्यावा, असे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे.
आतापर्यंत कंपनीचे एकही युनिट सुरू झालेले नसताना कोनसरीमधील 20 टक्के कुशल व अकुशल बेरोजगारांना या प्रकल्पाच्या कामात रोजगार मिळू शकला आहे. अशा परिस्थितीत गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार हे रोजगार मिळेल, या आशेने कंपनीकडे लक्ष देऊन आहेत. त्यामुळे कोनसरी परिसरातील इतर ग्रामपंचायतींनी कंपनीविरोधात रोजगारासाठी आताच मोर्चा काढणे योग्य नाही. आम्ही तुमच्या विरोधात नाही तर सोबत आहोत. इतरही ग्रामपंचायतींमधील बेरोजगारांना रोजगार मिळावा, अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळेच सध्या परिसरातील ग्रामपंचायतींमधून जागा भरल्या जात आहेत. आपल्या गावातील कुशल सुशिक्षित बेरोजगारांना किंवा लेबर म्हणून (सप्लाय) काम करणाऱ्या बेरोजगारांसाठी सुरवातीपासूनच कोनसरी ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचे बंधन घातलेले नाही. त्यामुळे कोनसरी वगळता इतर ग्रामपंचायतमधून प्रकल्पात 70 टक्के लेबर (सप्लाय) काम करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोनसरी ग्रामपंचायतमधील बेरोजगारांचा हक्क हिरावून कंपनीवर मोर्चा स्वरूपात दबाव आणने कितपत योग्य आहे? असा सवाल कोनसरी ग्रामपंचायतने केला आहे.
कोनसरी ग्रामपंचायतने दि.26 मे नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ठराव घेतला. त्यात म्हटले आहे की, जर इतर ग्रामपंचायती मोर्चा काढत असतील तर नाईलाजाने आम्हाला त्यांच्याविरोधात उभे राहावे लागेल. त्यामुळे ग्रामपंचायतीमधील आपसी संबंध खराब होणार नाही आणि तणाव वाढणार नाही याची काळजी घेण्यात यावी आणि कोनसरी ग्रामपंचायतच्या भूमिकेला सहकार्य करावे, अशी विनंती कोनसरी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, सदस्य गीता गद्दे, सुनीता कोवे, राकेश दंडिकवार, विजय सिडाम, सविता आत्राम, वैशाली करपते, ललिता मोहुर्ले, तसेच समस्त भूमिधारक शेतकरी व गावातील नागरिकांनी इतर ग्रामपंचायतींना उद्देशून केली आहे.