बोळधात रंगली भव्य पुरूष व महिला ग्रामीण भजन स्पर्धा

मा.आ. गजबे यांच्या हस्ते उद्घाटन

देसाईगंज : तालुक्यातील मौजा बोळधा येथे आदर्श युवा गणेश उत्सव मंडळ बोळधा (बाराभाऊ) यांच्या सौजन्याने गणेशोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीणस्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली होती. पुरुष आणि महिला अशा दोन गटांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेमुळे गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

पुरुष गटासाठी प्रथम बक्षीस 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार आणि तृतीय बक्षीस 5 हजार रुपये देण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट हार्मोनियम, तबला वादक व उत्कृष्ट गायक यांना प्रत्येकी 501 रुपयांचे वैयक्तिक बक्षीसही देण्यात आले. तसेच महिला गटासाठी प्रथम बक्षीस 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये आणि तृतीय 2 हजार रुपये याप्रमाणे बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते फित कापून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा होते. यावेळी प्रामुख्याने पुष्पराज गायकवाड, चेतन मस्के, भाग्यश्री गायकवाड, गोपाल उईके, मोहन गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.आ.कृष्णा गजबे म्हणाले, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ग्रामीण भागातील कलागुणांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून, अशा स्पर्धा युवकांना आत्मविश्वास व मंच मिळवून देतात. पारंपरिक भजनांसाठी गावागावात भरवण्यात येणाऱ्या कार्यक्रमामुळे सामाजिक ऐक्य वाढते व लोकसंपर्क वृद्धिंगत होतो. गणेश चतुर्थी आणि अशा स्पर्धा ग्रामीण भागात संस्कार व एकता प्रस्थापित करतात, तसेच स्थानिक कलागुणांना मंच मिळवून देतात. त्यामुळे अशा स्पर्धांचे आयोजन होणे आणि त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे, ते म्हणाले. त्यांनी आयोजक मंडळाचे कौतुक करून सर्व सहभागी भजन मंडळांना शुभेच्छा दिल्या.