गडचिरोली : भाऊबिजेसाठी माहेरी गेल्याच्या आनंदात असताना दुचाकीवरून ट्रिपल सिट बाजाराला जाण्याचे निमित्त झाले. समोरून येणाऱ्या दुसऱ्या दोन महिलांच्या दुचाकीसोबत त्यांची धडक झाली आणि पाचही जण रस्त्यावर पडले. त्याच वेळी काळ बनून आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात एक महिला पूर्णपणे ट्रकखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित चार गंभीर जखमी झाले. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही आ.कृष्णा गजबे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. त्यांनी घटनास्थळी नातेवाईकांचे सांत्वन करत रुग्णालयातही जखमींची भेट घेतली.
हा दुर्दैवी अपघात गुरूवारी (दि.7) दुपारी कोरची तालुक्यातल्या बेडगावनजिकच्या कोसमी गावाजवळ घडला. सेवाबाई रामसाय कोरेटी (35 वर्ष) रा.दामेसरा, ता.कुरखेडा) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात रमशिला दसरू काटेंगे (36 वर्ष, रा.दोडके, छत्तीसगड), माणिक नरेटी (25 वर्ष, रा.गोठणपार,ता.देवरी, जि.गोंदिया), दर्शना माणिक हलामी (22 वर्ष) आणि सोनम मडावी (24 वर्ष) गंभीर जखमी झाल्या आहेत.
सेवाबाई आणि रमशिला या बहिणी भाऊबिजेसाठी माहेरी चिलमटोला या गावी गेल्या होत्या. कोरची येथील आठवडी बाजार असल्याने त्या बहिणी माणिक नरेटी या नातेवाईक युवकासोबत बाजारासाठी जात होत्या. त्याचवेळी दोन युवती समोरून येत असताना दोन्ही दुचाकींची धडक झाली. सर्वजण खाली कोसळले असताना मागून येणाऱ्या लोहखनिजाच्या ट्रकने त्यांना चिरडले. सर्व जखमींना आधी कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
आ.गजबेंनी स्वत:च्या शालीने झाकला मृतदेह
कोरची येथील प्रचार आटोपून कुरखेड्याच्या दिशेने निघालेले आ.कृष्णा गजबे यांना अपघाताचे दृष्य दिसताच ते मदतीला धाऊन आले. मृत महिलेच्या छिन्नविछीन्न शरीराला झाकण्यासाठी त्यांनी स्वत:च्या गाडीतील शाल काढून मृतदेह झाकला. जखमींना रुग्णालयात हलविल्यानंतर नातेवाईकांचे सांत्वनही त्यांनी केले. त्यानंतर कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन तिथेही जखमींची विचारपूस करत डॅाक्टरांसोबत चर्चा केली.