वाघाने घेतला महिलेचा बळी, टोळीसाठी गेली होती जंगलात

पोर्ला वनपरिक्षेत्रातील घटना

गडचिरोली : मोहटोळी वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालून ठार केले. ही घटना गुरूवारी (दि.5) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मीरा आत्माराम कोवे (56 वर्ष) रा.देलोडा असे मृत महिलेचे नाव आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)

प्राप्त माहितीनुसार, ही महिला सकाळी गावाला लागून असलेल्या जंगलात मोहटोळ वेचण्यासाठी गेली होती. टोळी वेचण्यात त्या मग्न असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. बराच वेळ झाला तरी मीराबाई घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी मीराबाईचा मृतदेह आढळला.

वनविभागाने पंचनामा केला. पतीसह दोन मुले गमावलेल्या मीराबाई जेमतेम दिड एकर शेती आणि मोलमजुरी करून सून आणि दोन नातींचा सांभाळ करत होत्या. पण त्यांचाही आधार गेल्याने कोवे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.